नाशिकमध्ये रासायनिक प्रदूषणाचा धोका! सातपूरच्या पाण्यात घातक क्रोमियम आढळल्याचा दावा
अंबडपाठोपाठ सातपूरमध्येही रासायनिक प्रदूषणाचा गंभीर प्रकार उघड! पाण्यात घातक क्रोमियमसह शिसे, कॅडमियम, आर्सेनिक आणि पारासारख्या जड धातूंचे अंश आढळल्याचा दावा! त्यामुळे नाशिककरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नाशिकच्या सातपूर एमआयडीसीमधील प्लॉट क्रमांक एसएस-५१ येथील एका औद्योगिक युनिटमधून प्रक्रिया न केलेले पिवळसर रासायनिक सांडपाणी नैसर्गिक नाल्यालगतच्या खड्ड्यात सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
१४ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालानुसार, पाण्यात हेक्साव्हॅलेंट क्रोमियमचे प्रमाण १.१६ मिलिग्रॅम प्रतिलिटर आढळल्याचा दावा आहे. याशिवाय शिसे, कॅडमियम, आर्सेनिक, पारा, अँटीमनी आणि सेलेनियमचे अंशही आढळले आहेत.
विशेष म्हणजे, सातपूरमधील नैसर्गिक नाले पुढे गोदावरी नदीला मिळतात. त्यामुळे हे रासायनिक पाणी नदीत मिसळण्यासोबतच भूजलही प्रदूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे.
दरम्यान, रोशन केदार आणि प्रवीण शिलावट यांनी संबंधित उद्योगांवर कठोर कारवाई, नैसर्गिक नाल्यांची तपासणी आणि गोदावरीच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याची मागणी केली आहे.
आता प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रशासन यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे!





