न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी नगराध्यक्षांची भेट; शासन दरबारी मागण्या मांडणार
कराडमधील न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पाठिंबा दर्शवला आहे. आंदोलनस्थळी भेट देत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्याची ग्वाही दिली.
उच्च न्यायालयीन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील हजारो न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. कराडमध्येही सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याने न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे.
संपाच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगितले. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत शासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, नगरसेवक विजयसिंह यादव, नरेंद्र लिबे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता कराडच्या नगराध्यक्षांचाही पाठिंबा मिळाल्याने संपाला बळ मिळाले आहे.





