‘पप्पा, आम्ही मरू!’ दोन मुलांना बापाने कालव्यात फेकले!
‘पप्पा, आम्ही मरू… असं करू नका ना!’ दोन चिमुकल्यांची आर्त विनवणीही निष्फळ! चॉकलेट आणि वडापावचे आमिष दाखवून पोटच्या दोन मुलांना बापाने कालव्यात फेकल्याची धक्कादायक घटना!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नांदर गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.
सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सोमनाथ दामोदर रोडगे या ४० वर्षीय पित्याने आपली दोन मुले श्याम रोडगे (वय ५) आणि आर्यन रोडगे (वय ७) यांना चॉकलेट आणि वडापाव खाऊ घालण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर नव्या स्कुटीवरून त्यांना बाहेर नेले आणि जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकून दिल्याचा आरोप आहे.
यावेळी दोन्ही चिमुकले ‘पप्पा, आम्ही मरू, असं करू नका ना!’ अशी विनवणी करत होते. मात्र, त्यांचे काळीज पाझरले नाही.
हा प्रकार पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने दगडफेक केल्याची माहिती आहे.
दरम्यान, मुलांच्या अंगावर ओले कपडे घेऊन वडील एकटेच घरी परतल्यानंतर कुटुंबीयांना संशय आला. पोलिसांनी सोमनाथ रोडगे याला ताब्यात घेतले असून चौकशीत त्याने मुलांना कालव्यात फेकल्याची कबुली दिल्याची माहिती आहे.
श्याम आणि आर्यनचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून शोधमोहीम सुरू आहे. या घटनेने संपूर्ण नांदर गावावर शोककळा पसरली आहे.





