दोन तास ट्रॅफिकमध्ये रुग्णवाहिका! २० महिन्यांच्या आरांशचा मृत्यू
‘लेकराचा श्वास कोंडतोय, रस्ता द्या!’ आईची आर्त विनवणीही निष्फळ! रुग्णवाहिका दोन तास ट्रॅफिकमध्ये अडकली, २० महिन्यांच्या आरांशने आईच्या कुशीतच जीव सोडला!
रायगड जिल्ह्यातील अलिबागमधून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कामामुळे झालेल्या भीषण वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका तब्बल दीड ते दोन तास अडकल्याने २० महिन्यांच्या आरांश सुशील ठाकूर या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी बामणगाव येथे खेळताना आरांशने अचानक फुगा गिळला. फुगा घशात अडकल्याने त्याचा श्वास कोंडू लागला. आई-वडिलांनी तातडीने त्याला रुग्णवाहिकेतून अलिबाग जिल्हा रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, बेलकडे ते कुरुळदरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सायरन वाजवूनही रुग्णवाहिकेला रस्ता मिळाला नाही. अखेर तब्बल दोन तासांनंतर रुग्णालयात पोहोचलेल्या आरांशला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेनंतर ठेकेदार आणि प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पर्यायी मार्गाची व्यवस्था का करण्यात आली नाही? आपत्कालीन वाहनांसाठी रस्ता का मोकळा ठेवण्यात आला नाही?
संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
एका चिमुकल्याचा जीव गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का? हा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.





