पंढरपूरमध्ये गोळीबार! राजाभाऊ भिंगे यांची हत्या

Rokhthok Maharashtra 6 0

पंढरपूरच्या विठ्ठल नगरीत गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. इसबावी परिसरातील नवशक्ती चौकाजवळ शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री जेवणानंतर राजाभाऊ भिंगे हे घराबाहेर शतपावली करण्यासाठी आले होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
राजाभाऊ भिंगे हे शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच एका नगरसेवकाच्या हत्या प्रकरणाच्या चर्चेतही त्यांचे नाव आले होते.
मात्र, या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला की जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत.
विशेष म्हणजे, कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल होत असताना ही घटना घडल्याने शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हल्लेखोर कोण? हत्येमागचा सूत्रधार कोण? आणि पंढरपूरमधील वाढत्या गुन्हेगारीला आळा कधी बसणार? या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.