विवाहाचा दाखला हवा तर हजारो रुपये द्या! हडपसर महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा पैसे घेतानाचा VIDEO व्हायरल

Rokhthok Maharashtra 3 0

विवाहाचा दाखला हवा असेल तर अधिकृत फी व्यतिरिक्त हजारो रुपये मोजावे लागतात का? पुणे महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील विवाह नोंदणी विभागात नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, पैसे घेतानाचा व्हिडिओच एका सजग नागरिकाने मोबाईलमध्ये कैद केला आहे.
विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी नागरिकांना आधी महा-ई-सेवा केंद्रात सुमारे एक हजार रुपये द्यावे लागतात. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह दोन साक्षीदारांना घेऊन महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयात जावे लागते.
मात्र, तिथे गेल्यानंतर दाखला किती लवकर हवा, यावर पैशांचा व्यवहार सुरू होत असल्याचा आरोप आहे. तातडीने दाखला हवा असेल तर दीड हजार, दोन हजार आणि अगदी तीन हजार रुपयांपर्यंत मागणी केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
असाच अनुभव आलेल्या एका नागरिकाने पैसे देतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडिओमध्ये कर्मचारी नागरिकांसमोरच एक हजार रुपये स्वीकारून ड्रॉवरमध्ये ठेवताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. पैसे ऑनलाइन देता येणार नाहीत, रोखच द्यावे लागतील, असेही कर्मचाऱ्याने सांगितल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, याप्रकरणी महापालिकेचे अधिकारी डॉ. घनवट यांच्याशी संपर्क साधला असता, अधिकृत शुल्काव्यतिरिक्त कोणतेही पैसे घेतले जात नाहीत. असे पैसे घेतले जात असतील तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मग प्रश्न असा आहे की, नागरिकांकडून अधिकृत शुल्काव्यतिरिक्त पैसे उकळले जात असतील, तर या कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी होणार? आणि महापालिका प्रशासनाचा या विभागावर अंकुश आहे की नाही?

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.