पुण्यात टिंबर मार्केटला भीषण आग! ६० दुकाने जळाली
पुण्यातील भवानी पेठ परिसरातील टिंबर मार्केटमध्ये बुधवारी मध्यरात्री आगीची मोठी दुर्घटना घडली आहे.
पहाटे २ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास जय वल्लभ शाळेजवळील लाकडाच्या दुकानांना अचानक आग लागली. लाकडाचे साहित्य आणि ज्वलनशील वस्तूंमुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत परिसरातील तब्बल ५० ते ६० दुकानांना मोठा फटका बसला असून अनेक दुकाने जळून खाक झाली आहेत.
घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुणे अग्निशमन दलाच्या २४, पुणे कॅन्टोन्मेंटची १ आणि पीएमआरडीएच्या २ अशा एकूण २७ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
सुमारे १५० अग्निशमन जवानांनी दोन तासांहून अधिक काळ अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.
विशेष म्हणजे, आग जवळच्या निवासी वसाहतीत पसरू नये यासाठी अग्निशमन दलाने विशेष खबरदारी घेतली.
सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. सध्या घटनास्थळी कूलिंग ऑपरेशन सुरू असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.





