खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश ‘नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम लवकरच होणार सुरू’

Rokhthok Maharashtra 9 0

राजगुरुनगर – पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित असलेल्या नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरची भूसंपादन प्रक्रिया तत्काळ पूर्ण करुन या कामाची प्रत्यक्ष सुरुवात व्हावी, या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश आले असून दीड-दोन महिन्यात कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडीत सापडलेल्या वाहनचालकांची सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामासाठी खासदार डॉ. कोल्हे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत होते. या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या रॅम्पसाठी अतिरिक्त भूसंपादन करावे लागणार होते. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पीएमआरडीए यांच्याकडून भूसंपादन प्रक्रियेला विलंब होत असल्याने हे भूसंपादन करावे यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला. त्याचबरोबर भूसंपादन प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत पत्रव्यवहार व बैठक घेऊन राज्य सरकारला निर्देश देण्याची मागणी लावून धरली होती.

खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीयमंत्री गडकरी यांची १२ ऑगस्ट २०२६ ला नवी दिल्ली येथे भेट घेऊन या महामार्गावर चाकणसह व अनेक ठिकाणी रोजच वाहतूक कोंडी होत असल्याकडे लक्ष वेधत गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीयमंत्री गडकरी यांनी भूसंपादन रखडल्या प्रकरणी नापसंती व्यक्त करीत राज्य सरकारचे कान टोचले होते. त्यानंतर भूसंपादन प्रक्रियेला गती मिळून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एन्ट्री-एक्झिट रॅम्पसाठी लागणारी अतिरिक्त १०.६९ हेक्टर जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केली.

जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १६.७३ कि.मी. आणि १३.१८ कि.मी. अशा २ पॅकेजमध्ये काम करण्याचे निश्चित केले असून त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून १८.१०.२०२६ रोजी यशस्वी निविदा धारकास एलओए (Letter of Award) जारी केले आहे. त्यामुळे येत्या दीड-दोन महिन्यात प्रत्यक्ष काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीयमंत्री गडकरी मानले असून राज्य शासनाकडून आर्थिक सहाय्य म्हणून जीएसटी परतावा, भूसंपादन खर्च आणि रॉयल्टी सवलती देऊन एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामातील अडथळे दूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचेही आभार मानले. ते पुढे म्हणाले की, सुरुवातीला अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे सहापदरीकरण मंजूर झाले होते. परंतु तांत्रिक कारणांमुळे त्यावेळी झालेली निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यानंतर या महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तत्काळ निर्णय घेण्यासाठी केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याशी अनेक बैठका घेतल्या. तसेच पत्रव्यवहार केला. त्यानंतर गडकरी यांनी एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्याची तयारी दर्शवत त्याअनुषंगाने घोषणा केली.

त्यानंतर या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे सर्वेक्षण, डीपीआर बनवणे आणि प्रकल्पास प्रत्यक्ष मंजुरी मिळावी यासाठी सातत्याने आपण पाठपुरावा केल्याचे स्पष्ट करीत खासदार डॉ. कोल्हे यांनी खरं तर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर मार्गी लागेपर्यत करावे लागलेले प्रयत्न म्हणजे एक थकवणारा प्रवासच होता, अशी भावना व्यक्त केली. त्याचबरोबर आता प्रत्यक्ष काम लवकर सुरू व्हावे आणि ते लवकर पूर्ण होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरुच राहणार आहे, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.