लग्नाच्या पाचव्या दिवशी नवरी फरार! २.२० लाख घेऊन तरुणाची फसवणूक?
लग्नाला अवघे पाच दिवस झाले… आणि नववधूने पतीच्या चेहऱ्यावर गुंगीचा स्प्रे मारून घरातूनच पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यात समोर आला आहे. लग्नासाठी तब्बल २ लाख २० हजार रुपये दिल्यानंतर तरुणाची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील रुईखेड मायंब येथील संदीप हा पोलीस भरतीची तयारी करत होता. लग्न जमत नसल्याने मध्यस्थामार्फत जालना येथील पूजा नावाच्या तरुणीसोबत त्याचा विवाह ठरवण्यात आला. लग्नासाठी २ लाख २० हजार रुपयांचा व्यवहार ठरला आणि ५ नोव्हेंबर रोजी दोघांचा विवाह पार पडला.
मात्र लग्नाच्या अवघ्या पाच दिवसांत नववधूने संदीपच्या चेहऱ्यावर गुंगीचे औषध फवारल्याचा आरोप आहे. संदीप बेशुद्ध झाल्यानंतर घराची जाळी तोडून तिने पलायन केल्याची तक्रार आहे.
या प्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात तीन महिलांसह सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच टोळीने इतर तरुणांचीही लग्नाच्या नावाखाली फसवणूक केल्याचा संशय असून, पोलीस फरार नववधूचा शोध घेत आहेत.





