घाटकोपर रेल्वे स्थानकात 60 वर्षीय महिलेवर अत्याचार! 25 वर्षीय आरोपी 12 तासांत अटकेत
मुंबईच्या घाटकोपर रेल्वे स्थानकावर माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकलची वाट पाहणाऱ्या ६० वर्षीय महिलेवर रेल्वे स्थानकातील महिला स्वच्छतागृहात अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपीने स्वच्छतागृहाचा दरवाजा आतून बंद केला आणि महिलेवर हल्ला करत हे कृत्य केलं.
गुरुवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास फलाट क्रमांक २ आणि ३ च्या सीएसएमटी दिशेकडील महिला स्वच्छतागृहात हा प्रकार घडला. पीडित महिला आपल्या १७ वर्षीय मुलीसोबत खडवलीला जाण्यासाठी घाटकोपर स्थानकात आली होती. मुलगी फलाटावर थांबली असताना महिला स्वच्छतागृहात गेली आणि तिच्यामागे आरोपीही आत शिरला.
आरोपीने महिलेला धक्काबुक्की करत कपाळावर प्रहार केला आणि अत्याचार केला. घटनेनंतर महिलेने कर्तव्यावर असलेल्या होमगार्डला याची माहिती दिली.
यानंतर रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांच्या सूचनेनुसार चार पथकं तयार करण्यात आली.
अखेर अवघ्या १२ तासांत पोलिसांनी तस्लिम नूर मोहम्मद शहा या २५ वर्षीय तरुणाला अटक केली. तो मूळचा उत्तर प्रदेशचा असून असल्फा परिसरात राहत असल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे रेल्वे स्थानकांवरील महिलांच्या सुरक्षेचा आणि स्वच्छतागृहातील देखरेखीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





