जीनिव्हा: हवेतून करोनाच्या विषाणूची बाधा होऊ शकते अशी भीती 32 देशांमधल्या 239 शास्त्रज्ञांनी तीन दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. चिंतेची बाब म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनेही (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) यावर शिक्कामोर्तब केले आहे.
संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये बंदिस्त जागांमध्ये गर्दीच्या ठिकाणी हवेच्या माध्यमातून करोना पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.
तीन दिवसांपूर्वी 32 देशांमधील 239 शास्त्रज्ञांच्या समूहाने जागतिक स्तरावरील वैद्यकीय तज्ज्ञांना आवाहन केले होते की कोविड-19 हवेद्वारे पसरू शकतो. अनेक घटनांचा अभ्यास केल्यानंतर डब्ल्यूएचओने नमूद केले आहे की, काही ठिकाणचा करोनाचा उद्रेक बघता बंदिस्त जागी गर्दी होत असेल तर हवेद्वारे अर्थातच ड्रॉपलेट्सच्या सोबतीनं करोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रेस्टॉरंट्स, फिटनेस सेंटर्स, समूहगानासारख्या जागा अशा घटनांमध्ये असा प्रसार झाल्याचे दिसून येत आहे. बंदिस्त जागा, जिथं हवा पुरेशी खेळती नसते आणि अशा ठिकाणी गर्दी असेल व बराच काळासाठी करोनाबाधित व्यक्ती तिथं असेल तर हवेमधूनही इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अर्थात, केवळ व केवळ हवेमार्गे करोनाचा प्रसार अशा स्थितीत होणं कठीण आहे आणि हवेमार्गे व ड्रॉपलेटच्या माध्यमातून असा दोन्ही मार्गे प्रसार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
करोनाबाधिताच्या शिंकेद्वारे, खोकल्याद्वारे ड्रॉपलेट (शिंतोडे) बाहेर पडणं व त्यामुळे प्रसार होणं हेच अद्यापतरी गृहीतक असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे.