दिल्ली

महाराष्ट्राला 12 पद्म पुरस्कार झाकीर हुसेन यांना पद्म विभूषण, कुमार मंगलम बिर्ला, दीपक धर व सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण

नवी दिल्ली 25: सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. प्रसिध्द तबला वादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण तर उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, सुप्रसिध्द भारतीय सैध्दांतिक भौतिक शास्त्रज्ञ दीपक धर व प्रख्यात गायिका सुमन कल्याणपुर यांना पद्म भूषण यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य आठ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातून प्रसिध्द तबला वादक, झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिध्द गायिका सुमन कल्याणपुर, प्रसिध्द उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला व विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे दीपक धर यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच भिकू रामजी इदाते व गजानन माने यांना समाजसेवा क्षेत्रात अतुलनीय कार्यासाठी, शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला (मरणोपरांत) यांना व्यापार व उद्योग क्षेत्रात, कला क्षेत्रात गडचिरोलीतील सुप्रसिध्द झाडीपट्टी रंगकर्मी परशुराम खुणे, प्रसिध्द सिने अभिनेत्री रवीना टंडन व कुमी वाडिया यांना पद्मश्री जाहिर झाला आहे.

महाराष्ट्रातून पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये साहित्य व शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदानासाठी दोन मान्यवरांची निवड झाली आहे, यात साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ प्रभाकर मांडे व रमेश पतंगे यांचा समावेश आहे.

या वर्षी एकूण 106 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 6 पद्म विभूषण, 9 पद्म भूषण आणि 91 पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. यासह 19 महिला तर 02 हे परदेशी नागरिक आहेत. 7 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.