पुणेहडपसर

शिक्षणक्षेत्रात असं कसं घडतं !

सुधीर मेथेकर, ( हडपसर, पुणे )

अहो बारावीच्या प्रश्न पत्रिकेत चक्क उत्तर ! हे असं कसं घडतं ? हा सर्वात मोठा प्रश्न आहे ! शिक्षणक्षेत्रात काम करणारी मंडळी तज्ञ असतात असे म्हंटले जाते. असे असताना दरवर्षी काही ना काही चुका घडतातच कशा ? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो.

नुकत्याच सुरू झालेल्या राज्य मंडळाच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये तीन प्रश्नांऐवजी उत्तरे आणि मॉडरेटरसाठीच्या सूचना प्रकाशित झाल्याने 12वीचे परिक्षा देणारे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. आता या अक्षम्य चुकांचे अनेक कारणे पुढे येतील त्याला काही अर्थ नाही ! कारण पेपर तयार करणारी समिती नक्कीच तज्ञ असणारी असणार ! पेपर तयार झाल्यावर तज्ञ समिती नक्कीच तपासणी करत असावी ! असे असताना असे घडते म्हणजे यावर कोणाचेही काटेकोर लक्ष नाही असेच दिसून येते.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते ते आता होणार नाही असे वाटत असतानाच आता राज्यमंडळाच्या 12वीच्या परिक्षा मंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. जेथे दोन प्रश्न छापण्यात येणार होते तेथे एका प्रश्नाऐवजी उत्तर प्रश्न पत्रिकेत छापले गेले.

आता या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी विद्यार्थ्यांना काही सवलती दिल्या जातील हा भाग वेगळा. परंतु विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापचे काय ? शिक्षण क्षेत्राततरी अशा अक्षम्य चुका घडू नयेत असे वाटते.