पुणे

तुमच्यात दडलेला कलावंत बाहेर काढा : भाऊराव कऱ्हाडे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ‘कलावंत – विद्यार्थी मुक्त संवाद’ कार्यक्रम

अभिनय ही एक कला असून प्रत्येकामध्ये एक कलावंत दडलेला असतो. तो आपल्याला बाहेर काढता आला पाहिजे. आपली इच्छाशक्ती असेल आपला निर्धार पक्का असेल त्याला कोणताही अडसर येत नाही. भाषेचा अडसर येत नाही. कलावंताने आपल्या निर्मितीतून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे. चित्रपट निर्मितीत कथेतील आशय विषयाला जितकं महत्व असते तितकेच अभिव्यक्तीलाही असते. असे मत दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, अण्णासाहेब मगर महाविद्यालयात जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून मराठी विभाग, सांस्कृतिक विभाग व करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कलावंत – विद्यार्थी मुक्त संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, टीडीएम चित्रपटाचे मुख्य अभिनेते पृथ्वीराज थोरात,पटकथा लेखक प्रा. किरण गाढवे यांना निमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे होते. प्रा. डॉ. नाना झगडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.

 

विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांनी कला क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहिले पाहिजे. नाटय, चित्रपट, कला क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. कोणतेही कला क्षेत्र निवडणूक त्यात झोकून देऊन कष्ट घेतले तर उजवल भवितव्य आहे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी त्यांच्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.

 

या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, उपप्राचार्य प्रा.अनिल जगताप,मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रवीण ससाणे, प्रा. डॉ. नेहा पाटील, प्रा. नितीन लगड,डॉ. शुभांगी शिंदे, डॉ. वंदना सोनवले, प्रा.अनिता गाडेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सागर कांबळे यांनी मानले तर आभार डॉ. शुभांगी औटी यांनी मानले.