पुणे

शहर कार्यालयावर ताब्याचा प्रयत्न कराल तर खबरदार – शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा दिपक मानकर यांना इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत हे कार्यालय आपल्या नावावर असून यावर कोणीही दावा करु शकत नाही, असे म्हटले आहे. सध्या अजित पवार गट व शरद पवार गट यांच्यामध्ये जागोजागच्या पक्ष कार्यालयावरुन वाद सुरु झाले आहे. अनेक ठिकाणी वादावादी झाल्याचे देखील पाहण्यात आले आहे. आता पुणे शहर कार्यालयावर अजित पवार गटाने आक्रमक पवित्रा घेत दावा सांगितला आहे. त्यानंतर शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत हे कार्यालय आपल्या नावावर असून यावर कोणीही हक्क सांगू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जगताप म्हणाले की, जे कार्यालय उभारणी मध्ये नव्हते, त्यांना दावा सांगण्याचा प्रश्नच नाही. हे कार्यालय प्रशांत सुदाम जगताप या नावावर आहे. हे पक्षाच्या नावावर नोंद केलेले कार्यालय नसून प्रशांत सुदाम जगताप या नावावर करार करण्यात आला आहे. ज्यांनी नवीन गट काढला आहे, जे या नवीन गटाचे अध्यक्ष आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. आत्ता जे काही दिसत आहे त्यावर विश्वास ठेवू नका. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये याबाबत चित्र स्पष्ट होईल. यावेळी त्यांनी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनाही टोला लगावला आहे. या कार्यालयावर दावा सांगण्याआधी हे कार्यालय शोधत असताना आपण कुठे होतात याचे आत्मचिंतन करावे. यासंदर्भात तारेवरची कसरत करताना, सगळी जुळवाजुळव करताना आपण कुठे होतात याबाबत त्यांनी मनन व चिंतन करावे, असा टोला जगतापांनी मानकरांना लगावला आहे. तसेच अजित पवार यांच्या गटाकडून माझ्याकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र मी त्यांना आपल्या पुढील लढाईमध्ये मी आपल्यासोबत सहभागी नसेल असं स्पष्ट सांगितले आहे. पुण्यातील ५० नगरसेवक नॉट रिचेबल असून ते पुढची परिस्थिती पाहून निर्णय घेतील, असं जगताप म्हणाले. राष्ट्रवादी भवनाचा करार हा प्रशांत जगताप यांच्या नावे आहे. पक्षाचं कार्यालय जगतापांच्या नावावर असल्याने त्यांनी पक्षाची फसवणूक केल्याचा आरोप दीपक मानकर यांनी केला आहे. दरम्यान, कार्यालय न दिल्यास थोड्याच दिवसांत नवीन भव्य कार्यालया उभारणार असल्याचा इशाराच दीपक मानकरांनी प्रशांत जगताप यांना दिला आहे.