पुणेमहाराष्ट्र

“कांद्याचे भाव वाढले की सरकार हस्तक्षेप करते, मग दर पडल्यावर सरकार हस्तक्षेप का करत नाही?”, बच्चू कडुंचा शिंदे सरकारला घरचा आहेर….!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पिंपरी चिंचवड – केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. कांदा निर्यात शुल्क वाढीच्या निषेधार्थ आज राज्यभर आंदोलन करण्यात येत असतानाच, आता केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारच्या या घोषणेनंतर शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. तसेच यावर आता सरकारमधील शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी टीका करत विरोध केला आहे.

 

दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये “दिव्यांग विभाग आपल्यादारी” या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड मध्ये आले असता त्यांनी सरकारवर टीकेची झोड उडवली . कांदा परवडत नसेल तर खावू नका असे बोलणाऱ्या दादा भुसें यांच्यावर टीका करताना बच्चू कडु म्हणाले की माझ्याकडे लसूण आहे. मुळा आहे,लागले तर तुम्ही घेऊन जा अशी टीका त्यांनी दादा भुसे यांचे नाव न घेता केली. सरकार खाणाऱ्यांचा विचार करतं. पण शेतमाल पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा विचार करत नाही. ही नालायक प्रवृत्ती असल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे.

कडू म्हणाले की, कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप करतं. मग दर पडल्यानंतर सरकार हस्तक्षेप का करत नाही? अशा शब्दात कडू यांनी केंद्र सरकारला सवाल केला. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% कर लावला आहे. त्यावर बोलताना बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलंय. केंद्रातील सरकार नामर्द आहे. केवळ सत्तेसाठी आणि ग्राहकांचं हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने कांद्याबाबत हा निर्णय घेतलाय, या सरकारला शेतकऱ्यांचे काहीही देणेघेणे पडले नाही.असे बोलून कडू यांनी राज्य सरकार व केंद्र सरकार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.