पुणे

पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त भव्य चित्ररथ मिरवणूक

औंध, पुणे – रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.  कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त डॉ.  बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंधच्या वतीने कर्मवीर चित्ररथाची भव्य मिरवणूक औंधगावातून मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या मिरवणुकीचे उदघाटन महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.  अरुण आंधळे यांच्या हस्ते महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.  रमेश रणदिवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण, आयक्यूएसीच्या समन्वयक डॉ सविता पाटील, इतिहास विभागप्रमुख डॉ राजेंद्र रासकर, मानसशास्त्र विभागप्रमुख  डॉ.  तानाजी हातेकर, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. देवकी राठोड, वाणिज्य विभागप्रमुख डॉ.  बाळासाहेब कलापुरे, कार्यालयीन अधीक्षक मा. सखाराम शिंगाडे  इ.  मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मा.  प्राचार्य डॉ. अरुण आंधळे म्हणाले की, “जिद्द, कष्ट करण्याची वृत्ती, स्वाभिमान अशा अण्णांच्या अंगीभूत गुणांमुळेच उभ्या महाराष्ट्रभर रयत शिक्षण संस्था ज्ञानदानचे कार्य करू लागली. आजही तो ज्ञानयज्ञ अविरतपणे अखंड तेवत आहे.आण्णांनी आपल्या ७२ वर्षांच्या आयुष्यात रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या संस्थेची उभारणी केली. यामुळे खऱ्या अर्थाने बहुजन समाजातील मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडी झाली. यामुळे महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीची चांगली जडणघडण झाली. ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ असे म्हणत श्रमाच्या बदल्यात गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण उपलब्ध करुन दिले. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थी, पालक आणि समाज यांनी कर्मवीरांच्या विचारांचा आणि कार्याचा वसा आणि वारसा परिचित करून घ्यावा आणि त्याची जोपासना करावी. समाजाच्या पुनर्रचनेसाठी कर्मवीरांचे विचार उपयुक्त आहेत” असा विचार त्यांनी यावेळी मांडला.   
https://www.youtube.com/watch?v=E38vY-RLus0
कर्मवीरांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित या चित्ररथ मिरवणुकीला महाविद्यालयाच्या विकास समितीचे व  रयत शिक्षण संस्थेचे, चेअरमन मा. चंद्रकांत दळवी (भा. प्र. से. ), महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. ऍड. राम कांडगे,  महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. सदाशिव (बापू ) सातव, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. दत्तात्रय गायकवाड (मा. महापौर, मनपा, पुणे) यांनी शुभेच्छा दिल्या. 
पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३६ व्या जयंती सोहळ्यानिमित्त  चित्ररथाची भव्य मिरवणूक लेझिम व ढोल ताशांच्या गजरात आकर्षक फुलांची सजावट, तसेच रंगीबेरंगी पताका व फुग्यांची सजावट केलेल्या वाहनातून  कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली.
https://www.youtube.com/watch?v=aZX7UCL1Wcg
या चित्ररथ मिरवणुकीत महाविद्यालयातील सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  समाजातील सर्व घटकांपर्यंत कर्मवीर भाऊराव पाटील यांची जीवनदृष्टी व  कार्य पोहोचावे व समाजाला गोरगरिबांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळावी.  या उद्देशाने ही मिरवणूक दरवर्षी काढली जाते.  या मिरवणुकीला औंध गावातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. लेझीम पथकाच्या माध्यमातून या रॅलीचा प्रारंभ झाला.  एकूण ४०  विद्यार्थ्यांनी लेझीम पथकामध्ये भाग घेतला. त्याचबरोबर कर्मवीरांची “कमवा आणि शिका योजना”, “ स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” हे ब्रीद वाक्य या आशयाच्या घोषणा विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने दिल्या. कर्मवीरांचा जयजयकार,  रयत शिक्षण संस्थेचा विजय असो,  कर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय असो,  डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो इ घोषणाने औंध परिसर दुमदुमला. 
https://www.youtube.com/watch?v=BNRZ_Pb-wGw
या सोहळ्याचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  अरुण आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रमेश रणदिवे, डॉ. प्रभंजन चव्हाण, डॉ.  राजेंद्र रासकर, डॉ.  तानाजी हातेकर, डॉ.  सविता पाटील, डॉ. बाळासाहेब कल्हापुरे, शारीरिक शिक्षण संचालक सौरभ कदम,  श्री.  सखाराम शिंगाडे यांनी यशस्वीपणे केले.