पुणे

“Pune Crime News :- अंमली पदार्थाचा मोठा साठा पुण्यातील ससून हॉस्पीटलच्या गेटवर जप्त; एमडी कोट्यावधीचं असल्याने प्रचंड खळबळ… गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक -2 ची मोठी कारवाई…

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथकाने ससून हॉस्पीटलच्या गेटवरून अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी रात्री उशिरा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तब्बल 1 किलो 75 ग्रॅम वजनाचे 2 कोटी रूपये किंमतीचे एमडी जप्त केले आहे. या माहितीला गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे. ससून हॉस्पीटलच्या गेटवर मोठा अंमली पदार्थाचा साठा सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
2 कोटी रूपये किंमतीचं मेफेड्रोन पोलिसांनी जप्त केलं आहे. हे खुप मोठं रॅकेट असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पुणे पोलिसांनी याप्रकरणी ललित पटेल याच्यासह ससून हॉस्पीटलच्या कॅन्टीनमध्ये कंत्राटी पध्दतीवर काम करणार्‍या एकाला ताब्यात घेतलं आहे. तिसरा आरोपी हा ससून हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमिट असून त्याला याप्रकरणी नोटीस देखील देण्यात आली आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात येणार असल्याची माहिती अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे.

 

ललित पटेल हा कुख्यात असून त्याला ड्रग्सच्या तस्करी प्रकरणी यापुर्वीच पोलिसांनी अटक केलेली आहे. तो सध्या येरवडा कारागृहात होता. येरवड्यातील आरोपींवर ससून हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात येतात. तो उपचारासाठी ससूनमध्ये आला असावा. वॉर्ड नं. 16 मध्ये येरवडयातील कैद्यांवर उपचार केले जातात. तेथे खुप हाय प्रोफाईल बंदी ‘वेगवेगळे उपचार’ घेतात अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

वैद्यकीय उपचारासाठी ससूनमध्ये दाखल असलेल्या आरोपींकडून एवढया मोठया प्रकारचे रॅकेट कसे चालवले जावू शकते हा मोठा प्रश्न समोर आला आहे. वॉर्ड नं. 16 च्या समोर गार्ड असतात. पोलिस देखील असतात. असे असताना देखील हा उद्योग नेमकं कोणाच्या आशिर्वादाने सुरू होता हे मात्र गुलदस्त्यातच आहे. गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक एस.डी. नरके, पोलीस अमलदार नितीन जगदाळे, योगेश मांढरे चेतन गायकवाड, महेश साळुंखे, युवराज कांबळे, संतोष देशपांडे, संदीप जाधव यांच्या पथकाने केली.