पुणेमहाराष्ट्र

ड्रग माफिया ललित पाटीलला अभय देणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ससून रुग्णालयाबाहेर तीव्र आंदोलन

पुणे (प्रतिनिधी )
हजारो कोटी रुपयांचे ड्रग्स तयार करून विकणाऱ्या ललित पाटील या ड्रग माफियाने राज्यातील तरुण पिढीला विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं आहे. अशा माणसाला जास्तीत जास्त कडक शिक्षा करण्याचे सोडून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक बडे मंत्री व अधिकारी हे ललित पाटीलची गुलामी करण्यात, त्याला पाठीशी घालण्यात व्यस्त होते. अगदी पोलीसांच्या तावडीतून त्याला सहीसलामत पळवून लावण्याइतपत यांची मजल गेली. फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

 

जगताप पुढे म्हणाले, या प्रकरणाबाबत नागरिकांनी प्रश्न विचारायला सुरुवात करताच सरकारवरील दबाव वाढला. म्हणूनच ललित पाटीलला तात्पुरती अटक करून प्रकरण शांत करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न आहे.
हा अटकेचा खेळ करून नागरिकांना फसवण्याचा प्रयत्न गृहमंत्र्यांनी करू नये. ललित पाटील राज्यात ड्रग्जचे साम्राज्य उभारेपर्यंत राज्यातील कायदा व सुव्यवस्था झोपेत होती का ? याची चौकशी करावी. ललित पाटील अटकेत असताना त्याला ससून रुग्णालयात, पंचातारांकीत हॉटेलमध्ये सेवा कोण पुरवत होते ? याची चौकशी करावी, सरकारमधील कोणते मंत्री , अधिकारी ललित पाटीलचे बटीक म्हणून काम करत आहेत हे जनतेसमोर आणावे, तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास सक्षम नसल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात आले.

 

या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, कणव चव्हाण,किशोर कांबळे, विक्रम जाधव, शेखर धावडे, मीनाताई पवार, आसिफ शेख, मनाली भिलारे, गणेस नलावडे, रोहन पायगुडे, नरेश पगाडालू, शिल्पा भोसले यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.