पुणे

टिपू पठाणची दुसरी मोक्का कारवाई; बंटी पवार टोळीचा वाढता प्रभाव

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असतानाच, शहरात नवनव्या गुन्हेगार टोळ्यांची वाढ पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. बंडू आदेकर, प्रमोद माळवदकर, बाबा बोडके, गजानन मारणे, निलेश घायवळ, बापू नायर आणि शरद मोहोळ यांच्या टोळ्यांवर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, कोंढव्यातील टिपू पठाण आणि सिंहगड रोड परिसरातील बंटी पवार या नव्या टोळ्यांनी दहशतीचे जाळे निर्माण केले.

टिपू पठाण—मुळचा लोणी काळभोरचा. २०१३ मध्ये झालेल्या एका हत्या प्रकरणानंतर त्याचा गुन्हेगारी जगतात प्रवेश झाला आणि पाहता पाहता त्याने स्वतःची टोळी उभी केली. खूनाचे प्रयत्न, मारामाऱ्या, खंडणी आणि इतर एकूण १३ गुन्ह्यांत त्याचे नाव समोर आले.
२०१९ मधील गोळीबार प्रकरणानंतर त्याच्यावर पहिली मोक्का कारवाई करण्यात आली. काही प्रकरणांत निर्दोष मुक्तता झाली असली तरी परिसरातील त्याची दहशत मात्र वाढतच गेली. जमीन बळकावणे, जबरदस्ती, व्याजाचे व्यवहार — अशा मार्गाने त्याने आर्थिक साम्राज्य वाढवले.

यानंतर पुन्हा एका जमीन प्रकरणात गुन्हा नोंदवल्यानंतर, टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर दुसरी मोक्का कारवाई झाली आणि सध्या संपूर्ण टोळी कारागृहात आहे.
दरम्यान, त्याच टोळीतील शाहरूख उर्फ अट्टी शेख पोलिसांना पकडण्याच्या प्रयत्नात झालेल्या चकमकीत ठार झाला. या घटनेनंतर परिसरातील इतर गुंडांच्या मनात धास्ती बसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, सिंहगड रोडला बंटी पवारची टोळी सक्रिय आहे. प्रतिस्पर्धी टोळी नसतानाही, २९ सदस्य असलेली ही टोळी खून, दहशत आणि जबरदस्तीच्या प्रकरणांत नोंदली गेली. बंटी पवार २०२१ पासून एनडीपीएस गुन्ह्यात तुरुंगात असूनही, टोळीचे जाळे पोलिसांसमोर आव्हान ठरत आहे.