पुण्यातील फुरसुंगी–भेकराई रोडवरील पुलाच्या कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. उरुळी देवाची–फुरसुंगी नगरपरिषद हद्दीतील ओढ्यावर पुलाचे काम सुरू असले तरी कामाचा वेग अत्यंत मंद असल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले बॅरिकेड्स, इशारा फलक किंवा इतर सुरक्षा व्यवस्था दिसून येत नाही. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यालगतचा नाला आणि सुरू असलेले बांधकाम यामुळे अपघाताचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, पालक, नागरिक आणि अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. शेजारीच शिक्षण संस्था असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक कोंडीमुळे शालेय बस आणि इतर वाहनांनाही मोठा फटका बसत आहे.
अलीकडे राज्यातील विविध भागांत पावसाळ्यात घडलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवरही संबंधित ठिकाणी पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
नागरिकांचा सवाल असा आहे की, एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? पुलाचे काम लवकर पूर्ण करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्यात यावी, तसेच सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते आणि नागरिकांना सुरक्षित व वाहतूक कोंडीमुक्त प्रवास कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्यात धोकादायक पुलाचे काम! वाहतूक कोंडी, सुरक्षा नाही; ठेकेदारावर नागरिकांचा संताप
