पुणे

Crime news : किरकोळ भांडणातून पत्नीने तोंडावर ठोसा मारल्याने पतीचा दुर्दैवी अंत, पुण्याच्या वानवडी भागातील खळबळजनक घटना…!

पुणे : पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने रागाच्या भरात पतीला तोंडावर ठोसा मारला. मारहाणीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. क्षुल्लक कारणांवरून दोघांमध्ये वाद झाला आणि पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. नाकातून अधिक रक्तस्राव झाल्याने त्यांला गंभीर जखम झाली आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती भांडणातून वानवाडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला आहे. काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. निखिल पुष्पराज खन्ना ( वय वर्ष 36 )असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रेणुका निखिल खन्ना असं आरोपी महिलेचे नाव आहे. दोघांचा सहा वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. दुपारी त्यांच्यात भांडण झालं आणि पत्नीनं रागाच्या भरात पतीला तोंडावर ठोसा मारला. त्यानंतर त्यांच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्राव सुरु झाला. महिलेने डॉक्टर असलेले सासरे यांना फोन करून याची माहिती दिली. सासऱ्यांनी घरी येऊन निखिलला तपासले.

 

परंतु गंभीर बाब असल्यामुळे निखिल यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही आणि त्यांचा मृत्यू होतो. ही माहिती पोलिसांना देण्यात आली.वानवडी पोलिसांनी रेणुका खन्ना हीला ताब्यात घेतले आणि अधिक तपास सुरु केला. निखिल हा व्यवसायाने बिल्डर होता. रेणुका दारूच्या नशेत असल्याचं पोलिसांना संशय आला.त्यामुळे पोलिस कसून चौकशी करत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट न दिल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीने पतीच्या नाकावर जोरात ठोसा मारल्याने पतीचा मृत्यू झाला.

 

निखिल आई-वडील आणि पत्नीसमवेत राहत होते. पतीने लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट दिली नाही. तसेच, पत्नीचा दुबईत वाढदिवस साजरा केला नाही, या कारणावरून शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात रेणुकाने निखिल यांच्या नाकावर ठोसा मारला. त्यात नाकाचे हाड फ्रॅक्चर होऊन बराच रक्तस्राव झाला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.