पुणे

“भाजपच्या माजी व राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांच्या श्रेयवादात कात्रज-कोंढवा रस्ता बनला मृत्यूचा सापळा… अखेर ठेकेदारावर गुन्हा दाखल, प्रशांत जगताप यांनी सुनावले खडेबोल…

 

हडपसर विधानसभा मतदारसंघातील कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचून त्यात चार मुली बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. यातील ३ मुलींना वाचवण्यात यश आले एका मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला, भाजपचे माजी आमदार व अजित पवार गटाच्या विद्यमान आमदारांच्या श्रेयवादाच्या लढाईत कात्रज कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे,
या दुर्घटनेबद्दल संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आजी – माजी आमदारांना खडेबोल सुनावले.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार व फुटीर पक्षाचे विद्यमान आमदार यांच्यातील श्रेयवादाच्या लढाईमुळे हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा झाला आहे. मर्जीतील ठेकेदाराचे भले करण्याच्या नादात गेल्या काही वर्षात शेकडो नागरिकांना या रस्त्यावर आपले प्राण गमवावे लागले. अशा शब्दांत माजी आमदार योगेश टिळेकर व विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.

असंख्य नागरिकांच्या रक्ताने लाल झालेला हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा व रस्त्याचे काम सुरू असताना धोकादायक ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घ्यावी व कात्रज-कोंढवा रस्त्यावर झालेल्या दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केली होती, या मागणीची दखल घेत अखेर कोंढवा पोलिसांनी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

 कात्रज-कोंढव्या रस्ता परिसरात रुंदीकरण, तसेच समतल विलगकाच्या (ग्रेड सेपरेटरच्या) कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत जगदीश छगन शिलावत (वय ३५, रा. केसर लॉजमागे, महाकाली मंदिराजवळील मोकळ्या जागेत, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिलावत कुटुंबीय चाकू, सुरीला धार लावून देण्याचे काम करतात. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील मोकळ्या जागेत ते झोपडी बांधून राहतात. रस्ता रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. सरगम जगदीश शिलावत (वय १५), जनुबाई रमेश शिलावत (वय १६), तेजल जगदीश शिलावत (वय १२), मुस्कान देवा शिलावत (वय १६) खड्डयात साचलेल्या पाण्यात शनिवारी (८ जून) सकाळी अकराच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.

 

त्यावेळी मुस्कान खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पाय घसरून पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात सरगम, जनुबाई, तेजल पाण्यात उतरल्या. चौघी पाण्यात बुडाल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर जवानांनी चौघींना पाण्यातून बाहेर काढले. बेशुद्धावस्थेतील मुस्कानला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

ठेकेदाराने रस्ता रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील तपास करत आहेत.