पुणे

“प्लास्टरचे काम करताना पाचव्या मजल्यावरून पडून कामगार गतप्राण, मिस्त्री जखमी – ठेकेदारावर गुन्हा दाखल!

इमारतींच्या डक्टच्या भिंतींना प्लास्टरचे काम करताना ५ मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यु, मिस्त्री जखमी, ठेकेदारावर गुन्हा दाखल

हडपसर येथील ससाणेनगरधील वर्धमान टाऊनशिप येथील इमारतीच्या डक्टच्या भिंतीना प्लास्टरचे काम करीत असताना खाली पडून मिस्त्री व कामगार जखमी झाले. उपचार सुरु असताना कामगाराचा मृत्यु झाला. सुरक्षा साधने न पुरविणार्‍या ठेकेदाराविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

रोहितकुमार जांगडे (वय ३६, रा. लेबर कॅम्प, वर्धमान टाऊनशिप, ससाणेनगर, हडपसर, मुळ रा. छत्तीसगड) असे मृत्यु पावलेल्या कामगाराचे नाव आहे. शिवनाथ सुपेकर (वय ४०) हा मिस्त्री जखमी झाला असून त्याच्यावर भुजबळ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
याबाबत सहायक पोलीस फौजदार विजय जगताप यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी वसंत अर्जुन निंबाळकर (वय ४४, रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी) या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वर्धमान टाऊनशिपमधील क्यु नंबरच्या इमारतीत २२ एप्रिल रोजी दुपारी पाऊण वाजता घडली होती.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससाणेनगर येथील वर्धमान टाऊनशिप यातील इमारतींचे बांधकाम सुरु आहे. बिल्डिंग नंबर क्यु या इमारतीचे डक्टमध्ये प्लास्टरचे काम चालू होते. ५ व्या मजल्यावरील डक्टच्या भिंतीवर प्लास्टरचे काम चालू असताना ठेकेदार वसंत निंबाळकर यांनी कामगारांना कोणत्याही प्रकारचे संरक्षक साहित्य़ ज्यामध्ये सेफ्टी बेल्ट, हेल्मेट किंवा संरक्षक जाळीचा वापर केला नाही. भिंतीना प्लास्टरचे काम करीत असताना सुपेकर आणि जांगडे हे दोघे ५ व्या मजल्यावरुन खाली पडून गंभीर जखमी झाले. दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यात उपचार सुरु असताना रोहितकुमार जांगडे याचा मृत्यु झाला. पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव तपास करीत आहेत.