पुणे

हडपसर ते कवडीपाट रस्त्यावर जीवघेणे खड्डे! पालखीपूर्वीच नागरिकांचा प्रशासनाला सवाल

पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना हडपसर ते कवडीपाट टोलनाका दरम्यानचा रस्ता धोकादायक बनला आहे. फातिमानगर ते यवत उड्डाणपुल प्रकल्पासाठी सुरू असलेल्या माती परीक्षणानंतर खोदलेले खड्डे अद्याप पूर्णपणे बुजवण्यात आलेले नसल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आकाशवाणी चौक ते शेवाळेवाडीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाहनांची गती मंदावल्याने या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडीही होत आहे.
पालखीसाठी संपूर्ण पुणे शहरात प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असताना, हडपसरमधील या महत्त्वाच्या मार्गाकडे दुर्लक्ष का झाले? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. वारकऱ्यांची आणि सर्वसामान्यांची सुरक्षितता धोक्यात घालणाऱ्या या परिस्थितीला जबाबदार कोण, अशीही चर्चा सुरू आहे.
याबाबत हडपसर पालिका सहाय्यक आयुक्त कुणाल धुमाळ यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत रस्त्याची पाहणी करण्यात आली असून खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरच सर्व खड्डे दुरुस्त केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, पालखी आगमनापूर्वी हे काम पूर्ण होणार का? आणि नागरिकांना सुरक्षित व खड्डेमुक्त रस्ता कधी मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.