पुणे

मुस्लिम धर्म स्थळांवर एकतर्फी कारवाई नको : मुस्लिम शिष्टमंडळाची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे : केवळ हिंदुत्ववाद्यांचा अट्टाहास पुरवण्यासाठी मुस्लिम धर्मस्थळावर केली जाणारी एकतर्फी कारवाई अन्यायकारक असून अशा प्रकारच्या कारवाईला कायदेशीर विरोध केला जाईल. तसेच यासंदर्भात लवकरच आंदोलन देखील उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा पुणे महानगरपालिकेची माजी नगरसेवक गफूर पठाण यांनी आज पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना  दिला. 

पुणे शहरातील विविध भागांमध्ये मज्जित, मदरसा व दर्ग्यांवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.  ही कारवाई धर्मनिरपेक्षपणे केली जात नसल्याने तातडीने थांबवण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने शिष्टमंडळाद्वारे पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना देण्यात आले. यावेळी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे, माजी नगरसेवक अॅड. आयुब शेख, माजी नगरसेवक रफिक शेख,  माजी नगरसेवक गफूर पठाण, काँग्रेस पक्षाचे नेते महबूब शेख यांच्यासह मोहसिन शेख,रफीक शेख, महबूब नदाफ,जावेद खान, शहाबुद्दीन शेख, जावेद शेख, किसान जाफरी, रॉय शेख इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान, शहरांमध्ये दहा हजार पेक्षा अधिक धार्मिक स्थळे अनधिकृत आहेत. मात्र केवळ मुस्लिम धर्मस्थळावरच कारवाई करणे ही कायद्यातील असमानता दर्शवणारी बाब असून हा मुस्लिमांवरील धार्मिक अत्याचार असल्याने तो तातडीने थांबवण्यात यावा अशी भूमिका राहुल डंबाळे यांनी मांडली आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालय व राज्य शासनाच्या निर्देशानुसार नियमित होणाऱ्या धार्मिक स्थळांना नियमित करावे व कोणत्याही  धार्मिक स्थळांवर कारवाई करू नये; अशी भूमिका ज्येष्ठ नगरसेवक आयुब शेख यांनी मांडली.

देशात तणावाची परिस्थिती असताना संपूर्ण देश धार्मिक शक्ती विरोधात एकत्रित येत आहे. असे असताना भारतीय जनता पक्ष मात्र धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करत असेल व त्यासाठी ते मंदिर – मशीद असा वाद करत असतील तर ते निंदाजनक असल्याचे रफिक शेख यांनी सांगितले

तर कारवाई करताना कोणताही धर्म न पाहता कारवाई करणे अपेक्षित असताना; प्रशासन मात्र अत्यंत चुकीची भूमिका घेत कारवाई करत आहे. या विरोधात प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढली जाईल अशी माहिती यावेळी महबूब नदाफ यांनी घेतली आहे.