पुणे

माहिती कार्यालयातील वाहनचालक विलास कुंजीर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार; शासन सेवेत प्रामाणिकपणे सेवा निभावण्याला महत्त्व – उपसंचालक डॉ. किरण मोघे

पुणे, दि. ३०: पुणे विभागीय माहिती कार्यालयातील वाहनचालक श्री. विलास मारुती कुंजीर हे ३० वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शासकीय सेवेत शासन-प्रशासनाशी प्रामाणिक राहून सेवा निभावण्याला महत्त्व असून श्री. कुंजीर यांची कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभावना वाखाणण्याजोगी आहे, असे कौतुकोद्गार माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे यांनी याप्रसंगी काढले.

सत्कार समारंभाला जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, माहिती अधिकारी सचिन गाढवे, श्री. कुंजीर यांची पत्नी सुरेखा कुंजीर व सर्व कुटुंबीय तसेच विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

उपसंचालक डॉ. मोघे म्हणाले, शासकीय सेवा करत असताना नियुक्ती ते सेवानिवृत्ती या दोन बिंदूंमधील प्रवास सुखकर करुन इतरांना आनंद देता येणं महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांनी आपापसात समन्वय ठेऊन काम केल्यास शासन सेवेतील कालावधी सुखकर होतो. वरिष्ठांच्या शब्दाला नेहमीच मान देतांना सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय ठेवता आल्याने श्री. कुंजीर यांचा शासकीय सेवेतील प्रवास सुखकर झाला. सेवानिवृत्तीनंतर कुटुंबाला वेळ द्यावा, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा, स्वत:च्या व कुटुंबियांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

सातारा जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक विष्णू शिंदे यांनी देखील वाहनचालक आणि कॅमेरामन अशा दोन भूमिका एकाच वेळी निभावून शासनाची प्रामाणिकपणे सेवा केली. वाहनचालक पदावर काम करत असूनही फोटोग्राफीमध्ये कौशल्य त्यांनी दाखवले, असे कौतुकोद्गार डॉ. मोघे यांनी काढले. त्यांनी यावेळी श्री. कुंजीर व श्री. शिंदे यांना सेवापूर्तीनिमित्त पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ. रवींद्र ठाकूर, सचिन गाढवे, विलास कसबे तसेच सुनील झुंजार यांनी मनोगत व्यक्त केले.