पुणे

लोणी काळभोर परिसरातील २ सराईत गुन्हेगार २ वर्ष तडीपार

प्रतिनिधी – स्वप्नील कदम

लोणी काळभोर, ता. २०: पूर्व हवेलीत लोणी काळभोर व कदमवाक् वस्ती परिसरात दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांकडून २ वर्षा करीता पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. अशी माहिती पुणे शहर परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.

अनिकेत गुलाब यादव (वय २२, रा. जिल्हा परिषद शाळेच्या मागे, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) व प्रसाद उर्फ बाबु धनाजी सोनवणे, वय २१, रा. थेऊर-नायगाव रोड, चिंतामणी सोसायटीशेजारी, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) अशी तडीपार करण्यात आलेल्या दोन गुन्हेगारांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत यादव व प्रसाद उर्फ बाबु सोनवणे हे दोघेही लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आहेत. अनिकेत यादव याच्यावर बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगुन दहशत निर्माण करणे, दरोडा टाकणे, मारहाण करून धमकावणे, जबरी चोरी करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र जवळ बाळगणे यासारखे एकुण ५ गुन्हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तर प्रसाद उर्फ बाबु सोनवणे याच्यावर बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, दरोड्याची तयारी करणे असे ३ गुन्हे दाखल आहेत.

हे दोन्ही गुन्हेगार परिसरामध्ये दहशत निर्माण करत होते. नागरीकांना वारंवार त्रास देत होते. त्यामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला होता. सराईत गुन्हेगाराच्या वारंवार गुन्हेगारी कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवु नये. दोन्ही गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दोन्ही गुन्हेगाराचा अभिलेख तपासून तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांना प्रस्ताव पाठविला होता.दरम्यान, पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारीवृत्तीस आळा घालण्यासाठी तसेच आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करणे आवश्यक होते. म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ प्रमाणे गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे ग्रामिण जिल्ह्याच्या हद्दीतुन वरील दोन गुन्हेगारांना २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेले आहे. असे आदेश पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी पारित केले आहेत.

सदरची कारवाई परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार सुनील नागलोत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.