बीड

राज्यातील भीषण दुष्काळाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार –  शरद पवार

बीड : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात यावर्षी १९७२ पेक्षा भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे.  त्यामुळेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून दुष्काळग्रस्त भागातील जनतेला सगळ्यांनी मिळून मदत कशी करता येईल हे पाहण्याची आवश्यकता आहे.  यासाठीच आपण राज्याचे दौरे करीत असून, यासाठी उपाययोजना सुचवण्या संदर्भात आपण येत्या आठ दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी सांगितले.

पवार यांनी आज  बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागांना भेटी दिल्या असून, त्यांनी आज  जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा आणि बीड तालुक्यातील अनेक गावांना भेट दिली. शेतकऱ्यांशी जनतेशी विविध माध्यमातून संवाद साधला त्यानंतर बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावर्षी १९७२ पेक्षा भीषण दुष्काळ आहे, शेतक-यांची पीके गेली आहेत, पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांसाठी चारा नाही, पाणी नाही, सरकारने केलेली टँकर व्यवस्था अपुरी आहे. दुषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे, कामे नसल्याने नागरिकांच्या हाताला रोजगार नाही, ९५ टक्के शेतकर्‍यांना पीक विमा मिळालेला नाही, अशा चारही बाजुंनी सकंटांनी ग्रासले आहे. त्यामुळेच या अशा भीषण परिस्थितीत कोणतेही राजकारण न करता सरकारने शेतकर्‍यांना मदत करावी यासाठी आपण हे विषय राज्य आणि केंद्र सरकार समोरही मांडणार असून, त्यासाठी येत्या ८ दिवसात मुख्यमंत्र्यांशी स्वतः विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व इतर नेत्यांसह भेट घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.जनावरांच्या चारा छावण्यांसदर्भात बोलताना प्रत्येक जनावरांमागे दिले जाणारे ९० रूपये हे कमी असल्याने ते वाढवून १०० ते १०५ रूपये द्यावे, फळबागा वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान बीड जिल्ह्यातील चारा छावणी चालकांना अद्याप एक रूपयाचेही अनुदान मिळाले नसल्याने छावणी चालकांनी उद्या पासून छावणी बंदचा इशारा दिला होता. या संदर्भात त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष अशोक हिंगे यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा मांडल्या. मात्र शेतकरी संकटात असताना त्यांना पुन्हा संकटात टाकु नका, तुमचा प्रश्‍न मी मुख्यमंत्र्यांकडे मांडेल त्यासाठी थोडासा अवधी द्या अशी सुचना केली. त्यानंतर उद्यापासूनचे छावणी बंद आंदोलन ८ दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x