मंबई शहर

रोखठोक महाराष्ट्र बिग ब्रेकिंग न्युज…. बॉलिवूड मधील चॉकलेट हिरो पडद्याआड मुंबई मधील रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास, चाहत्यांवर शोककळा

 

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर सप्टेंबरमध्ये भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अभिनेता इरफान खानच्या निधनाला २४ तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर कलाविश्वातील ही दुसरी दु:खद बातमी समोर येत आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला. ‘तो गेलाय.. ऋषी कपूर गेलाय.. आणि मी उध्वस्त झालोय’; असं ट्विट बिग बींनी केलं.

ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.

कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन ऋषी कपूर भारतात परतले होते. ११ महिने ११ दिवस न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन ते भारतात परतले होते. परदेशी उपचार सुरू असताना त्यांनी अनेकदा मायदेशी येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्यांची खूप इच्छा होती. मला पुन्हा काम मिळेल ना, अशी चिंता ते मुलांकडे व पत्नीकडे व्यक्त करायचे.

 

बॉलीवूडचा चॉकलेट हिरो ऋषी कपूर यांच्याविषयी…

ऋषी कपूर यांनी 1970 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ चित्रपटाने ऋषी कपूर यांना खरी ओळख मिळवून दिली. ऋषी कपूर यांनी आतापर्यंत जवळपास 120 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या 45 वर्षांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टी गाजवली आहे. या दरम्यान त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत. 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ चित्रपटाने ऋषी कपूर यांना खरी ओळख मिळवून दिली. बॉबी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 2008 मध्ये फिल्मफेअर लाइफटाइम अचिवमेंट पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.

दरम्यान, ऋषी कपूर हे एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. त्यांनी चित्रपटांच्या शूटिंगलाही सुरुवात केली होती. अभिनेत्री जुही चावलासोबत ‘शर्माजी नमकीन’ या सिनेमाचं चित्रीकरण त्यांनी सुरु केलं होतं. मात्र, त्यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा अपुरीच राहणार आहे. त्यांच्या जमानातील अभिनेत्यांची मोठी परंपरा बॉलिवूडमध्ये सत्तर-ऐंशीचे दशक आपल्या मनमोहक भूमिकांनी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे नाव अजरामर राहणार यामध्ये तीळमात्र शंका नाही.

ऋषी कपूर यांचे गाजलेले चित्रपट

बॉबी, कर्ज, दो दुनी चार, खेल खेल मै, समटाईम्स, डी-डे, कपूर अँड सन्स, अमर, अकबर, अँथनी, लैला मजनू, सागर, ये वादा रहा, प्रेम रोग, नगिना, हम किसिसे कम, नही, चांदनी, दिवाना, मेरा नाम जोकर, अग्नीपथ, दामिनी, खोज, जमाने को दिखाना है, रफूचक्कर, सरगम, कर्ज, हनिमून, हीना, खेल खेल में, अमर अकबर अँथनी, हम किसीसे कम नही, बदलते रिश्ते, सागर, बोल राधा बोल असे एकापेक्षा एक चित्रपट गाजले आहेत.

ऋषी कपूर यांचा परिचय

ऋषी कपूर यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये झाला होता. त्यांचे खरे नाव ऋषीराज कपूर. ऋषी कपूर हे द ग्रेट शोमन राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांचे पुत्र, तर दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे नातू. मुंबईतील चॅम्पियन स्कूलमध्ये ऋषी कपूर यांचं शिक्षण झालं. ‘चिंटू’ या टोपणनावाने ते कपूर कुटुंबासह चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होते.

अभिनेत्री नीतू सिंगबरोबर 1980 मध्ये ते विवाहबद्ध झाले. पत्‍नी नीतू सिंगसोबत ऋषी कपूर यांची पडद्यावरील जोडी लोकप्रिय ठरली होती. दोघांनी लग्नापूर्वी जवळपास 12 सिनेमात एकत्र काम केलं होतं. 2010 मध्ये लग्नानंतर प्रथमच त्यांनी ‘दो दुनी चार’ सिनेमात एकत्र काम केलं.

ये हे जलवा, हम तुम, फना, नमस्ते लंडन, लव आज कल, पटियाला हाऊस यासारख्या चित्रपटात त्यांनी सहकलाकार म्हणून काम केले. हाऊसफुल 2 या चित्रपटात त्यांनी भाऊ रणधीर कपूर यांच्यासोबत काम केलं. ‘खजाना’ या चित्रपटानंतर हा दोन्ही भावांचा एकमेव चित्रपट होता. 1999 मध्ये त्यांनी ‘आ अब लौट चले’ हा चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यात राजेश खन्ना, ऐश्वर्या राय, अक्षय खन्ना यासारखी तगडी स्टारकास्ट होती. ‘कुछ तो है’ या सिनेमात ऋषी कपूर यांनी साकारलेला ‘सायको किलर’ चांगलाच गाजला. त्यानंतर हृतिक रोशनसोबत अग्निपथ चित्रपटात त्यांनी रंगवलेला ‘रौफ लाला’ हा खलनायक भाव खाऊन गेला होता.

ऋषी कपूर यांच्यासाठी किशोर कुमार, मोहम्मद रफी अशा अनेक दिग्गज गायकांनी गाणी गायली. विशेष म्हणजे ही सर्वच गाणी चांगलीच गाजली. ऋषी कपूर यांनी ‘खुल्लम खुल्ला’ या नावाने लिहिलेले आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. दोन वर्षांपूर्वी, 102 नॉट आऊट या चित्रपटात त्यांनी साकारलेली वृद्धाची भूमिका लोकप्रिय ठरली होती. 2019 मध्ये ‘द बॉडी’ हा त्यांचा प्रदर्शित झालेला अखेरचा चित्रपट ठरला.

कर्करोगाचं निदान

2018 मध्ये कर्करोगाचं निदान झाल्यानंतर ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु होते. त्यावेळी नीतू सिंग-रणबीर कपूरसोबतच आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा, अनुपम खेर, आमिर खान, शाहरुख खान, दीपिका पदुकोन, करण जोहर आणि मलायका अरोरा असे अनेक कलाकार त्यांना भेटून गेले होते. उपचाराअंती जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर ऋषी कपूर सप्टेंबर 2019 मध्ये मायदेशी परत आले होते.

‘मला आता बरं वाटतंय आणि मी कोणतंही काम करु शकतो. पुन्हा अभिनय सुरु करण्याचा विचार आहे. प्रेक्षकांना आता माझं काम आवडेल की नाही, हे माहित नाही. न्यूयॉर्कमध्ये मला बर्‍याचदा रक्त देण्यात आलं. तेव्हा मी नीतूला म्हणायचो – मला आशा आहे, नवीन रक्त असूनही मी अभिनय विसरणार नाही” अशी प्रतिक्रिया ऋषी कपूर यांनी सप्टेंबर 2019 मध्ये दिली होती.

ऋषी कपूर यांनी चित्रपटांच्या शूटिंगलाही सुरुवात केली होती. अभिनेत्री जुही चावलासोबत ‘शर्माजी नमकीन’ या सिनेमाचं चित्रीकरण त्यांनी सुरु केलं होतं. मात्र त्यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा अपुरीच राहणार आहे.

—————-

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x