दिल्ली

अखेर विकास दुबेला अटक; उज्जैनमधून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार मुख्य आरोपी विकास दुबे याला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

२ जुलै रोजी कानपूर येथे अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर कुख्यात गुंड विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून विकास दुबे फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याच्यावर पाच लाखांचे बक्षिसही जाहीर केले होते. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

गल्या आठवड्यापासून उत्तर प्रदेश पोलीस विकास दुबेच्या मागावर होते. यासाठी इतर राज्यांच्या पोलिसांचीही मदत घेतली जात होती. दरम्यान याआधी पोलिसांनी विकास दुबेच्या तीन सहकाऱ्यांना चकमकीत ठार केले आहे. यामधील एक सहकारी अमर दुबे याला बुधवारी ठार करण्यात आलं होतं. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी सकाळी हमिदपूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत अमर दुबेला ठार केले. पोलीस हत्याकांड प्रकरणात अमर दुबेदेखील आरोपी होता. पोलिसांना मोस्ट-वॉण्टेड आरोपींची एक यादी काढली असून यामध्ये अमर दुबेचे नाव पहिल्या क्रमांकावर होते.

दुसरीकडे पोलीस विकास दुबेचा शोध घेत असताना बुधवारी तो पुन्हा एकदा पोलिसांच्या हातून निसटला होता. विकास दुबे हरियाणामधील फरिदाबाद येथील एका हॉटेलमध्ये पाहण्यात आले होते. मंगळवारी पोलिसांनी फरिदाबाद येथील हॉटेलवर छापा टाकून एका व्यक्तीला अटक केली. चौकशी केली असता पोलीस पोहोचण्याआधीच विकास दुबेने हॉटेलमधून पळ काढला असल्याची माहिती त्याने दिली होती. पण अखेर पोलिसांना विकास दुबेला अटक करण्यात यश मिळाले आहे.

विकास दुबे याच्यावर हत्या, अपहरण, खंडणी, दंगल भडकवणे असे ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. विकास दुबे याला पोलिसांनीच अटकेसाठी पथक येत असल्याची माहिती दिली होती. या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x