दिल्ली

आपण भाजपात प्रवेश करणार नाही ; सचिन पायलट यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड पुकारले असून ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना कालपासून उधाण आले होते. मात्र सचिन पायलट यांनी आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. सचिन पायलट भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार असून यावेळी त्यांच्या भाजपा प्रवेशाची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण सचिन पायलट यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या चर्चांना फेटाळून लावले आहे.

सचिन पायलट यांनी रविवारी आपल्याला पक्षाच्या ३० आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे.दुसरीकडे काँग्रेसने सचिन पायलट यांचा दावा फेटाळून लावला असून आपल्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. रविवारी दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी रात्री २.३० वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसने आपल्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. जयपूरमध्ये अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद पार पडली.

विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे नी यावेळी सांगितलं की, ‘१०९ आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान सरकार तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे’. इतर काही आमदारांचं मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा झाली असून तेदेखील सकाळी पत्रावर स्वाक्षरी करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

दरम्यान सकाळी विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार असून यासाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. ‘वैयक्तिक किंवा महत्त्वाचं कारण न देता गैरहजर राहणाऱ्या आमदारांवर कडक कारवाई केली जाईल,’ असं अविनाश पांडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. दुरीककडे भाजपाने ‘वेट अँण्ड वॉच’ची भूमिका घेतली असल्याचं कळत आहे. काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडणार असून यावेळी घेण्यात येणाऱ्या निर्णयाकडे भाजपाचं लक्ष असणार आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x