मुंबई

पशू आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

मुंबई,  : आयुष्यभर आपण ज्यांच्या जीवावर जगतो त्या शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या जपणुकीसाठी पशू आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पशुसंवर्धन विभागास दिले.

७३ फिरत्या पशुचिकित्सालयांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवास्थानी फिरत्या पशुचिकित्सालयाला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. ही ७३ फिरती पशुचिकित्सालये राज्याच्या दुर्गम भागातील तालुक्यांमध्ये जिथे पशुवैद्यकीय सुविधा जवळपास उपलब्ध नाही अशा ठिकाणी कार्यान्वित झाली आहेत. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह पुण्याहून पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानात आपल्या माणसांबरोबर आपल्या पशुधनाचाही समावेश आहे. त्यामुळेच पशुचिकित्सेसारख्या महत्त्वाच्या विषयावरही शासनाने लक्ष केंद्रीत केले आहे.

* 1962 हा टोल फ्री नंबर गावागावात पोहोचवा.

पशुधन आजारी असल्याचे शेतकऱ्यांना कळते परंतु यापुढे काय करायचे, कुठे आणि कसे जायचे हा त्यांच्यापुढचा प्रश्न असतो. त्यामुळे १९६२ हा फिरत्या पशुचिकित्सालयांसाठी जो टोल फ्री क्रमांक आहे त्याची माहिती गावागावात पोहोचवावी, जनजागृती करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना या चिकित्सालयासंबंधिची माहिती मिळून ते त्याचा लाभ घेऊ शकतील. ही केवळ ॲम्ब्युलन्स नाही तर चिकित्सालय आहे, यात उपचाराची, कृत्रिम रेतनाची सोय आहे. आवश्यकतेनुसार पशुधनाला या वाहनातून उपचारासाठी इतरत्र हलवताही येणार आहे. ही माहितीही पशुपालकांपर्यंत पोहोचवावी, या माध्यमातून नित्य नवे प्रयोग हाती घ्यावे. या फिरत्या पशुचिकत्सालयामध्ये काम करणाऱ्या पशुवैद्यकांनी आणि वाहनचालकाने संवदेनशील राहून काम करावे असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.

पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार म्हणाले की, मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेअंतर्गत पशुपालकांना त्याच्या पशुधनाची काळजी घेण्यासाठी फिरते चिकित्सालय घरी येऊन सेवा देणार आहेत यामुळे त्यांचा वेळ, पैसा वाचणार आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पशुपालन, कुक्कुटपालन यावर अवलंबून आहे. यासाठी ग्रामीण भागातील लहानातील लहान घटकाला मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेअंतर्गत सेवा देण्यात येणार आहे.

* सामंजस्य करार.

अद्ययावत कॉल सेन्टर उघडण्यासाठी इंडसइंड बँकेची उप कंपनी भारत फायनान्स इन्क्लुजन लि. सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. भारत फायनांस इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीद्वारे पशुसंवर्धन विभागाबरोबर सामंजस्य करार करुन त्यांच्या सीएसआर फंडातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून या सेंटरची कामे करण्यात येणार आहेत. भारत फायनांस इन्क्लुजन लिमिटेड ही कंपनी कॉल सेंटर कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक संगणक, विशेष सॉफ्टवेअर आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ पुरविणार असून पशुसंवर्धन विभाग, यांचे मार्फत औषधी व उपकरणांनी सुसज्ज फिरते पशुचिकित्सा वाहन, वाहन चालक व तज्ञ पशुवैद्यक उपलब्ध करून देणार आहे असे श्री. केदार यांनी यावेळी सांगितले.

पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यातील पशुसंवर्धनावर भर देण्यात येत असून त्यांचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे, त्याकरिता उत्कृष्ट दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. राज्यातील दुर्गम, डोंगराळ, आदिवासी बहुल भागामध्ये तसेच ज्या भागामध्ये पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी आहे, दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा आहेत, अशा तालुक्यात पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांच्या, शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी, मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरु करण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना कशी राबविण्यात येणार याविषयीची चित्रफीत दाखविण्यात आली. पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. पशुसंवर्धन विभागचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.केंडे यानी सुत्रसंचलन केले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x