पुणे

‘कोरोना’ची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना प्रादुर्भाव व लसीकरण तयारीचा आढावा

पुणे,दि. 22:

‘कोरोना’बाधितांची संख्या कमी होत असली तरीही संकट अजून टळलेले नाही. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन केले पाहिजे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक चाचण्या घेणे, तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या लवकर चाचण्या करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबतही त्यांनी आढावा घेत लसीकरण व्यवस्थापनात केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.
‘कोविड व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, (व्हिसीव्दारे) राज्य उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार वंदना चव्हाण, आमदार राहुल कुल, आमदार चेतन तुपे, आमदार सुनिल टिंगरे, आमदार अशोक पवार, आमदार सिद्धार्थ शिराळे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. डी. बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहर व जिल्ह्यात ‘कोरोना’ची संख्या अजूनही पुरेशा प्रमाणात कमी झालेली नाही, ही चिंतेची बाब आहे. ब्रिटनहून महाराष्ट्रात आलेल्या काही प्रवाशांमध्ये नवीन स्ट्रेनचे काही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांबाबत माहिती घेऊन त्यांची तपासणी आणि चाचण्या करा, तसेच कोरोना विषाणूच्या बदलत्या स्वरुपाच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
डॉ.सुभाष साळुंके यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस, कोरोना चाचण्या, व प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत माहिती दिली.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रुग्णालय व्यवस्थापन, रुग्णोपचार व्यवस्थापन, प्रयोगशाळा तपासणी, कोविड सुविधा केंद्र, परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांबाबत शासनाच्या सूचना व त्याबाबची कार्यवाही, कोविड लसीकरणाबाबत सुरू असलेली कार्यवाही, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची माहिती तसेच रुग्णालयीन व्यवस्थापन चोख असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ब्रिटनमध्ये कोरोना प्रतिबंधात्मकउपाययोजना तसेच लसीकरण व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.
पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गाबाबतची स्थिती, उपाययोजना व लसीकरण केंद्राबाबत माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x