पुणे

बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह सकारात्मक – खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे – बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह आणि पशुसंवर्धन खात्याचे सहसचिव ओ. पी. चौधरी यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकेवरील सुनावणी प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. कोल्हे यांनी काल केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन ‘बैल’ हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी करणारे निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी आपल्याला चुकीची माहिती दिल्याचे श्री. गिरीराज सिंह सांगून या संदर्भात गुरुवारी बैठक घेण्याचे आश्वासन देत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानुसार आज केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह आणि पशुसंवर्धन खात्याचे सहसचिव ओ. पी. चौधरी यांच्या समवेत बैठक पार पडली.

यावेळी डॉ. कोल्हे यांनी बैलगाडा शर्यती हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पारंपरिक खेळ असून दरवर्षी होणाऱ्या ग्रामदैवतांच्या यात्रोत्सवात नवसाचे‌ बैलगाडे पळविण्याची प्रथा असल्याचे निदर्शनास आणले. त्याचबरोबर गावोगावच्या यात्रा-उत्सवांच्या निमित्ताने शेती अवजारांपासून ते विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तु, कपडे, मिठाई, धान्य आदींची मोठी उलाढाल होते. सांस्कृतिक कार्यक्रम, वाजंत्री या सारख्या कलावंतांची उपजिवीका या यात्रा-उत्सवांवर अवलंबून असते. मात्र बैलगाडा शर्यतबंदीमुळे हा सर्व व्यापार ठप्प झाला असून व्यापारी, कलावंत व बलुतेदार यांच्या उपजिवीकेचा प्रश्न गंभीर बनला आहे, याकडे लक्ष वेधले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खिलार जातीच्या देशी बैलांचा वापर शेतीकामासाठी केला जात नाही. त्यामुळे बैलगाडा शर्यती बंद झाल्याने खिलार जातीच्या देशी बैलांचा सांभाळ करणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. परिणामी या बैलांची कमी दराने विक्री होऊन त्यांची रवानगी अनधिकृतपणे कत्तलखान्यात होत आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन खिलार जातीच्या देशी बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून गेल्या काही वर्षांतील बैलांच्या संख्येतील घट पाहता पुढील काही वर्षांत हा खिलार जातीच्या देशी बैलांचा वंश नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे अशी भूमिका खासदार डॉ. कोल्हे यांनी ठासून मांडली.

पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांनी खासदार डॉ. कोल्हे यांची भूमिका उचलून धरताना बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून आपण ही बंदी उठेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x