पुणे

सांसद आदर्श ग्राम कोपरे येथे झिंक अल्युम स्टील प्री फॅब्रिकेटेड मेटॅलिक टँकसाठी निधी मंजूर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश

नारायणगाव – सांसद आदर्श ग्राम कोपरे – मांडवे येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून जिल्हा नियोजन समितीने नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत रु. ३६.७० लक्ष रकमेच्या २ झिंक अल्युम स्टील प्री फॅब्रिकेटेड मेटॅलिक टँकच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

कोपरे, मांडवे, जांभुळशी व मुथाळणे ही जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी क्षेत्रातील गावे वर्षानुवर्षे पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. त्यामुळे सांसद आदर्श ग्राम योजनेत कोपरे गाव दत्तक घेतल्यानंतर इथला पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरताच खासदार डॉ. कोल्हे यांनी प्रयत्नांचा वेग वाढवल्याने निश्चित स्वरुपाची पावलं पडताना दिसत आहेत. त्यामुळेच जिल्हा नियोजन समितीच्या यंदाच्या वार्षिक आराखड्यातून पहिल्या टप्प्यात काठेवाडी (कोपरे) येथील झिंक अल्युम स्टील प्री फॅब्रिकेटेड मेटॅलिक टँकसाठी रु. १७.९९ लक्ष तर शेलाचा माळ (मांडवे) येथील टँकसाठी रु. १८.७१ इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

तसेच यापूर्वी कोपरे (रु. २० लक्ष)आणि जांभुळशी (रु. २०.३० लक्ष) येथे सिमेंट बंधाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण रु. ४०.३० लक्ष इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे सांसद आदर्श ग्राम कोपरे परिसरातील पाणी प्रश्न सुटण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे म्हणता येईल.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, सांसद आदर्श ग्राम योजनेत जाणीवपूर्वक दुर्गम आदिवासी भागातील कोपरे गावाची निवड केली होती. त्यामुळे कोपरे, मांडवे, मुथाळणे व जांभुळशी या गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा निश्चय केला होता. परंतु कोविडच्या संकटामुळे अडथळे निर्माण झाले होते. परंतु या काळातही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे बैठका घेतल्या. त्यामुळे ३.५ एमसीएफटीचे ३ बंधारे बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री पाटील यांनी दिले. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात येत असून लवकरच मंजुरीसाठी सादर करण्यात येईल. त्याचबरोबर स्व. मीनाताई ठाकरे पाणी साठवण योजना राबविण्यासाठीही सर्वेक्षण झाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गांनी इथला पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मला खात्री आहे की, मला नक्की यश मिळेल असा विश्वास खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.