पुणे

उत्तम काम करून गावाचा विकास करा- सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील

पुणे, दि.७:- माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि उत्तम प्रकारचे काम करून गावाचा विकास करा. परिश्रमपूर्वक गावाचा विकास करणाऱ्याच्या पाठीशी शासन असल्याचे प्रतिपादन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या आवारात ‘यशदा’च्यावतीने आयोजित लातूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंचसाठी सुरु असलेल्या प्रशिक्षण वर्गास भेटीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, सरव्यवस्थापक दिपक शिंदे, संस्थेचे संचालक डॉ. भास्कर पाटील, यशदाचे उपसंचालक भिमराव वराळे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, गावात विकासात्मक कामे करतांना सर्वांना सोबत घेत बारकाईने लक्ष देवून कामे करुन घ्यावीत. कामातून लातूर जिल्ह्यची ओळख राज्याचा नकाशावर येण्यासाठी सतत प्रयत्न करावे. गावातील नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती द्यावी. या प्रशिक्षणाचा उपयोग करुन गावातील समस्या सोडवाव्यात. सतत नवनवीन प्रयोग करुन गावाची प्रगती करावी, असेही ते म्हणाले.

प्रशिक्षण वर्गाच्यावतीने वाढोना खुर्दचे सरपंच विलास मुसणे यांनी सहकार व पणन मंत्री श्री. पाटील यांचा सत्कार केला.

‘यशदा’च्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा उपयोग गावाच्या विकासासाठी नक्की करु, अशा विश्वास सरपंचांनी व्यक्त केला.