पुणे

चेष्टेत झालेल्या भांडणातून मित्राने केला मित्राचा खून रक्तरंजित चाकू घेऊन आरोपी थेट पोलीस स्टेशनमध्ये

प्रतिनीधी: स्वप्नील कदम

पुणे : गमतीत झालेल्या भांडणातून एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मित्रानेच मित्रावर चाकुने सपासप वार करत त्याचा निर्घृण अंत केला. यानंतर त्या आरोपी मित्राने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मित्राला ताब्यात घेतलं आहे.
अमन अशोक यादव (वय 26) असं खून झालेल्या मित्राचं नाव आहे. तर, चेतन पाटील असं खून करणाऱ्या मित्राचं नाव आहे. पुण्यातील आसरीएम गुजराती शाळेसमोरील फुटपाथवर ही घटना घडलीये.आरोपी चेतन पाटील आणि अमन अशोक यादव हे दोघेही पक्के मित्र होते. ते कचरा वेचण्याचे काम करतात. काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये अगदी किरकोळ कारणावरुन वाद झाला. अमन ते विसरला पण चेतनने त्याचा राग डोक्यात ठेवला.
बुधवारी (1 डिसेंबर) सकाळच्या सुमारास ते दोघे कचरा गोळा करण्यासाठी भेटले. कचरा गोळा करण्यासाठी जेव्हा ते आसरीएम गुजराती शाळेसमोर आले. येथील फुटपाथवर ते कचरा गोळा करण्याचं काम करत असताना त्यांच्यात पुन्हा बाचाबाची सुरु झाली. याचे रुपांतर वादात झाले आणि रागाच्या भरात चेतन पाटील याने अशोक यादव वर चाकुने सपासप वार केले. त्यानंतर अमनला त्याच अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात सोडून तो थेट पोलीस ठाण्यात पोहोचला.हातात रक्तरंजित चाकू घेतलेल्या चेतन पाटीलला पाहून काही काळ पोलिसांचीही धांदल उडाली. चेतन पाटीलने पोलिसांना घडलेली सारी हकीगत सांगितली आणि त्याने अशोकचा खून केल्याची कबुली दिली. चेतनने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा तिथे त्यांना अशोक यादवचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर, आरोपी मित्र चेतन पाटीलला ताब्यात घेतलं आहे.