राजकारण

“श्रीलंका अध्यक्षांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची अवस्था होईल ? तृणमूलच्या आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ..”

श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्थिती होईल असं विधान तृणमूल काँग्रेसचे आमदार इदरिस अली यांनी केलं आहे. दोन कोटी २० लाख लोकसंख्येचे श्रीलंका बेट गेल्या सात दशकांतील सर्वात तीव्र आर्थिक संकटात सापडलं असून शनिवारी नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. अध्यक्ष राजपक्षे यांच्या विरोधात घोषणा देत हजारो लोक कोलंबोत एकत्र आले आणि त्यांनी राजपक्षे यांच्या सरकारी निवासस्थानाकडे कूच केले. अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी आंदोलकांच्या भीतीने शुक्रवारीच घरातून पोबारा केला होता.

ममता बॅनर्जी यांना कोलकातामधील सियादलाह मेट्रो स्थानकाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर इदरिस अली यांनी ही टीका केली आहे. ११ जुलैला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे.

ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्री असताना हा प्रकल्प सुरु केला होता, त्यामुळे त्यांना आमंत्रित न करणं हा भेदभाव आहे. उद्घाटन समारंभासाठी राज्य सरकारमधील कोणत्याही व्यक्तीला आमंत्रित न केल्याने तृणमूलचे नेते संतापले आहेत.

याआधी अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अधिकृत कार्यक्रमातून ममता बॅनर्जी यांना वगळण्यात आलं होतं. तृणमूल काँग्रेसने याला प्रत्युत्तर देत केंद्र सरकार फूट पाडण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, भाजपाने तृणमूलने राज्य सरकारच्या कार्यक्रमांना भाजपा आमदार, खासदरांना आमंत्रित न करण्याची परंपरा सुरु केल्याचा आरोप केला आहे.

श्रीलंकेत नेमकं काय सुरु आहे?

आर्थिक गर्तेत गटांगळय़ा खाणाऱ्या श्रीलंकेतील हजारो संतप्त नागरिक अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या राजीनाम्यांची मागणी करीत शनिवारी कोलंबोच्या अतिसुरक्षित फोर्ट भागातील त्यांच्या निवासस्थानी घुसले. तर दुसऱ्या बाजूला आंदोलकांनी पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या खासगी मालकीच्या घराला आग लावली. श्रीलंकेतील सरकारविरोधातील आतापर्यंतचे हे सर्वात मोठे आंदोलन असून देशात अराजक माजल्याचे चित्र आहे.

मागे न हटण्याचा आंदोलकांचा निर्धार

संतप्त निदर्शक कोलंबोकडे निघाले तेव्हा त्यांची अनेक ठिकाणी पोलिसांशी तसेच रेल्वे अधिकाऱ्यांशी झटापट झाली. आंदोलकांनी रेल्वे अधिकाऱ्यांना कोलंबोला रेल्वेगाडय़ा सोडण्यास भाग पाडले. ‘व्होल कंट्री टू कोलंबो’ अशी घोषणा देत आंदोलक उपनगरांतून कोलंबोच्या फोर्ट भागात दाखल झाले. अध्यक्ष राजपक्षे राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निदर्शकांचा निर्धार आहे.

माजी क्रिकेटपटूंचा निदर्शनांना पाठिंबा

सनथ जयसूर्या, कुमार संघकारा यांसह श्रीलंकेच्या काही माजी क्रिकेटपटूंनी कोलंबोत सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी पाठिंबा दिला. ‘‘अपयशी नेत्याच्या हकालपट्टीसाठी संपूर्ण देश एकवटल्याचे दृश्य मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिलेले नाही, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचा माजी कर्णधार जयसूर्या याने व्यक्त केली. ‘‘मी श्रीलंकेच्या नागरिकांच्या पाठीशी उभा आहे. आम्ही लवकरच विजय साजरा करू’’, असे अर्थगर्भ ट्वीट जयसूर्याने केले आहे.

सर्वपक्षीय सरकारसाठी..

श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी शनिवारी सर्वपक्षीय सरकार स्थापनेसाठी राजीनाम्याची घोषणा केली. नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विक्रमसिंघे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता. अखेर सर्व नागरिकांची सुरक्षितता आणि सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी राजीनामा देत असल्याची घोषणा त्यांनी केली.

राजपक्षे यांचा बुधवारी राजीनामा

शुक्रवारीच अज्ञातस्थळी गेलेले अध्यक्ष गोताबया राजपक्षे येत्या बुधवारी राजीनामा देणार आहेत. तशी घोषणा संसदेचे सभापती महिंदा अबेयवर्धने यांनी शनिवारी रात्री उशिरा केली. पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर अबेयवर्धने यांनी राजपक्षे यांना राजीनामा देण्याची लेखी सूचना केली होती. त्यानंतर राजपक्षे यांनी, १३ जुलैला राजीनामा देणार असल्याची माहिती कळवली.