महाराष्ट्र

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे

राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अनेक ज्वलंत प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे हे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे राज्य सरकार्यवाह श्री शिवाजी खांडेकर यांनी याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच भेट घेऊन त्यांच्यासमोर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणींचा पाढाच वाचून दाखवला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांचे निवेदन याप्रसंगी शिवाजी खांडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

मुंबई येथे विधान भवनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवाजी खांडेकर यांनी भेट घेतली. यावेळी शिवाजी खांडेकर यांनी राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आजही प्रलंबित असल्याने त्यांचे हाल होत आहेत, त्यांच्या हक्कावर गदा येत आहे. शिक्षकाप्रमाणेच शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहेत तेव्हा त्यांना न्याय द्यावा, त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी शिवाजी खांडेकर यांनी केली. यावेळी उपस्थित शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर यांनाही मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे , नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सुधीर तांबे, महामंडळाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विनोद गोरे आदी उपस्थित होते.