आंदोलक उत्तम कामठे यांना फोनद्वारे धमकी कचरा डेपोविरोधातील लढा थांबविण्यासाठी पैशांचे आमिष?; आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप

Rokhthok Maharashtra 6 0

फुरसुंगी : फुरसुंगी-उरुळी देवाची येथील कचरा डेपोच्या नियमबाह्य कामांविरोधात तसेच प्रस्तावित नवीन कचरा प्रकल्पाविरोधात आंदोलन करणारे ग्रामस्थ उत्तम कामठे यांना फोनद्वारे धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आंदोलनातून माघार घेण्यासाठी यापूर्वी फोन करून पैशांचे आमिष दाखविण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा कामठे यांनी केला असून, आता पुन्हा धमकीचा फोन आल्याने आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडे फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

आंदोलनाची धार कमी करण्यासाठी पडद्यामागून हालचाली?

कचरा डेपोच्या प्रश्नावर गेल्या अनेक दिवसांपासून कृती समितीच्या माध्यमातून उत्तम कामठे यांच्यासह ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण आणि परिसराच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या भूमिकेविरोधात आवाज उठविला जात आहे. मात्र, आंदोलनाची धार कमी करण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू असल्याचा आरोप कामठे यांनी केला आहे.

आंदोलन थांबविण्यासाठी पैशांचे आमिष दाखविण्यात आले आणि आता थेट फोनद्वारे धमकी देण्यापर्यंत प्रकार पोहोचल्याचा दावा करण्यात आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. धमकीचा फोन नेमका कोणी केला, पैशांचे आमिष कोणी दाखविले आणि या सर्व प्रकारामागे कोणाचा सहभाग आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

धमकीमागे कोण? पोलिस तपासाकडे लक्ष

कचरा डेपोच्या प्रश्नावर नागरिकांमध्ये तीव्र भावना असताना आंदोलनकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप गंभीर मानला जात आहे. धमकी देणारी व्यक्ती कोण, फोन कुठून करण्यात आला आणि आंदोलन थांबविण्यासाठी कोणाच्या सांगण्यावरून दबाव आणला जात आहे, याचा तपास आता पोलिसांकडून होणार आहे.

कचरा डेपोच्या नियमबाह्य कामांविरोधातील आणि प्रस्तावित नवीन प्रकल्पाविरोधातील आंदोलनावर या प्रकाराचा परिणाम होणार का, तसेच धमकी देणाऱ्यांचा शोध घेऊन पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, याकडे फुरसुंगी-उरुळी देवाची परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

—

चौकट | “असल्या धमक्यांना भीक घालत नाही!”

“कचरा डेपोच्या नियमबाह्य कामांविरोधात आणि नवीन कचरा प्रकल्पाविरोधात आम्ही नागरिकांच्या हक्कासाठी लढत आहोत. यापूर्वी मला फोन करून माझ्यासह इतर सहकाऱ्यांना पैशांचे आमिष दाखवून आंदोलन मॅनेज करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता फोनद्वारे धमकी देऊन आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणत्याही दबावाला किंवा पैशांच्या आमिषाला आम्ही बळी पडणार नाही. कचरा प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. धमकी देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.”

— उत्तम कामठे, ग्रामस्थ, फुरसुंगी.

 

रोखठोक न्युज (गणेश भागीवंत) 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.