विद्यानंद बापट हल्ला प्रकरणात संतोष चव्हाण अटकेत!
पुण्यात विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे.
गणेशोत्सवात लाऊडस्पीकर आणि डीजेच्या वापराला विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी संतोष चव्हाण याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
पोलिस तपासात संतोष चव्हाण याच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. मारामारी आणि कट रचण्यासारख्या प्रकरणांमध्ये यापूर्वीही त्याच्यावर कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. तो गणेश मंडळाचा कार्यकर्ता असून, सराईत गुन्हेगार म्हणूनही त्याची नोंद असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, सुमारे तीन वर्षांपूर्वी संतोष चव्हाणने स्वतःच्या वडिलांनाही मारहाण केली होती. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याच्यासोबतचा संपर्क तोडल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, विद्यानंद बापट यांना मारहाण केल्यानंतर संतोष चव्हाण हनुमान नगर परिसरात गेला होता. काही मित्रांची भेट घेतल्यानंतर त्याने मोबाईल बंद केला. त्यामुळे पोलिसांसमोर त्याचा शोध घेण्याचे आव्हान होते. अखेर गुन्हे शाखेने तपास करत त्याला अटक केली.
या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यानंद बापट यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त देण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनीही बापट यांना यापुढे पोलिस संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे.





