‘पोटात दुखतंय मम्मी’ म्हणत रडत घरी आली चिमुकली; स्कूलबस चालक ताब्यात, POCSO अंतर्गत गुन्हा
पनवेलमधून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.
कामोठे परिसरात अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर स्कूलबस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
२ सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर चिमुकली स्कूलबसने घरी जात होती. घरी पोहोचल्यानंतर ती रडत आईकडे आली आणि “पोटात दुखतंय मम्मी” असं सांगितलं. त्यानंतर तिने बसचालकाने आपल्यासोबत केलेल्या कृत्याची माहिती कुटुंबीयांना दिल्याचा आरोप आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने कामोठे पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी इस्को आरगुम यादव, वय ३० या स्कूलबस चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित चिमुकलीचा जबाब, वैद्यकीय तपासणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, लहान मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या स्कूलबस चालकांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी आणि चारित्र्य पडताळणी केली जाते का? असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.
या प्रकरणात पोलिस तपासातून आणखी काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे





