पुण्यात शिक्षिकेची निर्घृण हत्या! उज्वला काकडे यांच्यावर भररस्त्यात हल्ला
पुण्यात भररस्त्यात महिला शिक्षिकेची निर्घृण हत्या… मागून वाहनाची धडक, धारदार शस्त्राने वार आणि डोक्यात दगड घालून हत्या! पुरंदर तालुक्यातील पांगारे गावात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
उज्वला रामदास काकडे, वय ४७, या हडपसरमधील साधना विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना न्यू इंग्लिश स्कूल पांगारेजवळ त्यांना मालवाहू वाहनाने पाठीमागून धडक देण्यात आली.
त्यानंतर आरोपीने धारदार शस्त्राने त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर वार केले, तसेच डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. या हल्ल्यात उज्वला काकडे यांचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, ज्या दिवशी त्यांची हत्या झाली, त्याच दिवशी त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. पतीचे यापूर्वीच निधन झाले असून, त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे.
या हत्येमागे आर्थिक व्यवहार किंवा जमिनीच्या वादाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.





