आंबेगावच्या पारधीताईंचे निलंबन मागे; आता दोषी ठेकेदाराची चौकशी करा, मनसेचा इशारा!
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात अंगणवाडी सेविका पारधीताई यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे. मात्र, या कारवाईनंतर आता दोषी ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
चिमुकल्या मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जाबाबत आवाज उठवणाऱ्या अंगणवाडी सेविकेवरच कारवाई का करण्यात आली? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
निकृष्ट आहाराचा पुरवठा झाला असेल, तर संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसेच पारधीताई यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
भविष्यात अंगणवाडी सेविकांना त्यांच्या अडचणी, मानधनाचे प्रश्न आणि आहाराच्या दर्जाबाबतच्या तक्रारी सुरक्षितपणे मांडता याव्यात, यासाठी स्वतंत्र ‘तक्रार निवारण पोर्टल’ किंवा ॲप सुरू करण्याची मागणीही मनसेने केली आहे.
या मागण्यांसंदर्भात मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास भगवानराव निम्हण यांनी मुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांना २४ ऑगस्ट रोजी निवेदन पाठवले आहे.
दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी न झाल्यास ‘मनसे स्टाईलने’ तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.





