२२ जणांचा बळी घेणाऱ्या विषारी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार जेरबंद!
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २२ जणांचा बळी घेणाऱ्या विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे!
मुख्य आरोपी बाळू लोंढे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी ऊरळी कांचन परिसरात बुधवारी सायंकाळी पाठलाग करून पकडले.
गुन्हा दाखल झाल्यापासून लोंढे फरार होता आणि पोलिसांना सतत गुंगारा देत होता. त्याने ओळख लपवण्यासाठी दाढी-मिशा कापून वेषांतर केले होते, तसेच मळकट कपडे परिधान केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांना त्याच्या ऊरळी कांचन परिसरातील हालचालींची माहिती मिळताच सापळा रचण्यात आला. पोलिसांना पाहताच तो पळू लागला, मात्र पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले.
या विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून, आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे. आता मुख्य आरोपीच्या चौकशीत या प्रकरणातील आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे





