दिवेआगरची सहल बेतली जिवावर! आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू
दिवेआगरची सहल आठ विद्यार्थ्यांच्या आयुष्याची अखेरची सहल ठरली… आळंदीवर शोककळा पसरली आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. आळंदीतील विनर्स अकॅडमीच्या अकरावी-बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगर येथे गेले होते.
एकूण ४८ जणांच्या या गटात २५ मुले, १७ मुली आणि सहा शिक्षकांचा समावेश होता. समुद्रात उतरलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही जणांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही आणि आठ विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात ओढले गेले.
बचाव पथक, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र, यश किरण वानखेडे, सोहम भांडवलकर, तन्मय वहिले, कौस्तुभ दौंड, कैवल्य वासनकर, राजवीर वहिले, प्रणव बनसोडे आणि सुमित अहिरे या आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
अवघ्या १६ ते १७ वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बातमी आळंदीत पोहोचताच आठ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर शैक्षणिक सहलीतील विद्यार्थ्यांची सुरक्षा, शिक्षकांची देखरेख आणि समुद्रकिनारी घेण्यात आलेली खबरदारी याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नेमकी चूक कोणाची होती, हे अधिकृत चौकशीतूनच स्पष्ट होणार आहे.





