कोल्हापुरात खळबळ! लग्न ठरल्याने प्रेयसीला दरीत ढकलल्याचा आरोप!
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न ठरल्यानंतर प्रेमसंबंध पुढे सुरू ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून २३ वर्षीय तरुणीला २५० फूट खोल दरीत ढकलून हत्या केल्याचा आरोप तिच्या प्रियकरावर आहे.
तरन्नूम बशीर नाईक असं मृत तरुणीचं नाव असून, या प्रकरणी २५ वर्षीय श्रीपाद दिनकर वडर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांचे गेल्या साडेपाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, सुमारे चार महिन्यांपूर्वी तरन्नूमचं लग्न ठरल्यानंतर तिने भेटणं टाळलं होतं. शुक्रवारी, ९ ऑक्टोबर रोजी संशयिताने तिला नाईकवाडी येथील कड्यावर नेल्याचा आरोप आहे. तिथे प्रेमसंबंध संपवण्याच्या मुद्द्यावरून वाद झाल्यानंतर तिला दरीत ढकलल्याचा संशय आहे.
घटनेनंतर तरुणी बेपत्ता झाल्याचा बनाव केल्याचा आरोपही संशयितावर आहे. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बचाव पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.





