पुण्यात भीषण अपघात! नवीन कात्रज बोगद्याजवळ २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू!
पुण्यातील मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर एक दुर्दैवी अपघात घडला आहे. नवीन कात्रज बोगद्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या १८ चाकी कंटेनरला स्कूटीची पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात २२ वर्षीय साक्षी सावंत हिचा मृत्यू झाला, तर तिच्यासोबत असलेली मैत्रीण रेणुका कांबळे गंभीर जखमी झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघीही दुचाकीवरून बाह्यवळण मार्गाने जात असताना हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की दोघीही रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र साक्षीला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या प्रकरणी कंटेनर चालक योगेश सातपुते याच्याविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताच्या कारणांचा पुढील तपास पोलीस करत आहेत.रस्त्यावर उभ्या असलेल्या अवजड वाहनांमुळे पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.





