स्थगिती असतानाही भूमी ग्रीन एनर्जी कंपनीत ८०० मेट्रिक टनांपर्यंत कचरा प्रक्रिया सुरू फुरसुंगी-उरुळी देवाचीतील ग्रामस्थ, सर्वपक्षीय नगरसेवक व आंदोलक आक्रमक; प्रकल्पाला ठोकले कुलूप

Rokhthok Maharashtra 8 0

स्थगिती असतानाही भूमी ग्रीन एनर्जी कंपनीत ८०० मेट्रिक टनांपर्यंत कचरा प्रक्रिया सुरू

फुरसुंगी-उरुळी देवाचीतील ग्रामस्थ, सर्वपक्षीय नगरसेवक व आंदोलक आक्रमक; प्रकल्पाला ठोकले कुलूप

१८ सप्टेंबरच्या बैठकीचे आश्वासन फोल  ठरल्याचा आरोप

रोखठोक न्युज (गणेश भागीवंत): फुरसुंगी-उरुळी देवाची परिसरातील भूमी ग्रीन कंपनीच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला स्थगिती असतानाही येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प गुपचुपपणे सुरू असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थ, आंदोलक आणि फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी (दि. १) प्रकल्पाचा सुरू असलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करून त्याला कुलूप ठोकले. यावेळी दोन्ही गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भूमी ग्रीन एनर्जी कंपनीच्या प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येत ग्रामस्थांनी प्रकल्पाला कुलूप ठोकत प्रक्रिया प्रकल्प बंद पाडला. यावेळी कृती समितीचे विशाल हरपळे, रणजीत रासकर, उत्तम कामठे, राहुल हरपळे, उपनगराध्यक्ष ओंकार कामठे, नगरसेवक गणेश ढोरे, महेश हरपळे, संतोष पवार, बाळासाहेब हरपळे, संदीप हरपळे, चंद्रकांत ढमाळ, विकास भाडळे, प्रशांत भाडळे, दत्ता राऊत, दिलीप भापकर, राम हरपळे, सचिन शितोळे, मुन्ना मुलानी, भूपेंद्र बेंगळे, अक्षय हरपळे, महेश कामठे, अनिकेत काळे, संजीत सिंग परदेशी, सोमनाथ यादव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व आंदोलक उपस्थित होते.
प्रकल्पाला स्थगिती असतानाही भूमी ग्रीन कंपनीमध्ये मंजूर क्षमतेपेक्षा दुपटीने तब्बल ८०० मेट्रिक टनांपर्यंत कचऱ्यावर प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या बैठकीच्या नावाखाली दोन्ही गावांतील नागरिकांची पुणे महानगरपालिकेने फसवणूक केली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. बैठकीनंतरही भूमी ग्रीन कंपनीतील कचरा प्रक्रिया सुरू राहिल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. आंदोलकांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून स्थगिती आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि दोन्ही गावांच्या कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.
_____________________________

स्थगिती असतानाही भूमी ग्रीन कंपनीमध्ये कचरा प्रक्रिया सुरू ठेवली जात असेल, तर ही गंभीर बाब आहे. १८ सप्टेंबरच्या बैठकीचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात बैठक घेण्यात आली नाही, त्यामुळे आता केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही.
…विशाल हरपळे (ग्रामस्थ, फुरसुंगी)
___________________________
फुरसुंगी आणि उरुळी देवाचीतील नागरिकांच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नगरसेवकांची भूमिका स्पष्ट आहे. स्थगिती असताना प्रकल्प सुरू ठेवणे योग्य नाही. प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल.
… गणेश ढोरे (नगरसेवक, फुरसुंगी नगरपरिषद)
__________________________

दोन्ही गावांतील नागरिकांनी अनेक वर्षांपासून कचरा प्रश्नाचा त्रास सहन केला आहे. बैठका घेऊन आणि आश्वासने देऊन वेळकाढूपणा करण्याऐवजी भूमी ग्रीन कंपनीतील कचरा प्रक्रिया तातडीने थांबविण्याची गरज आहे. ग्रामस्थांच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
…बाळासाहेब हरपळे (सामाजिक कार्यकर्ते, फुरसुंगी)
___________________________

“१८ सप्टेंबरला बैठक घेण्याचे सांगून ग्रामस्थांना आश्वस्त करण्यात आले; मात्र त्यानंतरही प्रकल्पातील प्रक्रिया सुरूच राहिली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. कचरा प्रकल्पाबाबत प्रशासनाने आता स्पष्ट आणि ठोस निर्णय घ्यावा; केवळ बैठका आणि आश्वासनांनी हा प्रश्न सुटणार नाही.
…प्रशांत भाडळे (गटनेता, नगरपरिषद)
_____________________________

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.